Monday, January 22, 2018

घर

आज या घरातला शेवटचा दिवस,
आवराआवर करत त्याला आठवला....

त्याच्या लहान मुलीचा तिथे असताना झालेला जन्म,
तिला झोपवता झोपवता त्याने मारलेल्या येरझाऱ्या,
मोठ्या मुलाने भिंतीवर काढलेली चित्रं आणि मुळाक्षरं,
पऱ्यांच्या गोष्टी सांगताना खिडकीतून डोकावणारा चंद्र,
आयुष्याची मरगळ झटकून रोज नविन दिवस देणारा सूर्य,
ग्रीष्मातल्या उन्हाने होणाऱ्या काहिलीला शमवणारा पाऊस,
बायको खेटून झोपल्यामुळे उबदार वाटलेल्या थंडीच्या रात्री,
चौकटीवर बायकोने कुंकवाने काढलेली लक्ष्मीची पावले,
आईच्या मृत्यूची बातमी ऐकताना त्या भिंतींनी दिलेला आधार....

खूप आठवणी होत्या त्या घरात कधीही न विसरण्यासारख्या,
त्याची पावलं अडखळली होती तिथेच तोच बायकोचा आवाज आला....

"आवं, येताय नव्हं? दुसऱ्या साईटवर जायचं नाही का?
खाली मुकादम गाडीत बसून बोंब मारतोय तुमच्या नावानं!
लवकर चला, आजची मजुरी बुडायला नको!"

- डॉ. विनय काटे

22 जानेवारी 2018

Wednesday, October 18, 2017

एस टी

रा.प.म. - प्रवाशांच्या सेवेसाठी!!

कधी एसटीतल्या कंडक्टर, ड्रायव्हर लोकांचे पगार विचारलेत कुणी? त्यात तो तर कंत्राटी असला तर विचारूच नका. कामाचे तास कधीही दिवसाला 8 पेक्षा कमी नसतात आणि ओव्हरटाईमला गाजराचा भाव मिळत नाही. दूर अंतराच्या गाडीने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहायला डेपोत जेलच्या तोडीची सोय असते. ना झोपायला गादी, ना चांगले जेवण, ना स्वच्छ टॉयलेटची सोय. स्वतःच्या घरून आणलेल्या सतरंज्या असल्या तर ठीक नाहीतर वर्तमानपत्राच्या घडीवर झोपायचे. एसटीच्या डेपोतल्या कँटीनमध्ये चांगले जेवण मिळत नाही, म्हणून मग कुठल्यातरी रोडलगतच्या ढाब्यावर अनधिकृत स्टॉप घेऊन थोडा पोटाला आधार दयायचा आणि प्रवासीपण खुश की किमान चांगल्या जागी खायला थांबलोय. डेपोत भरणा करताना रकमेत नजरचुकीने जरी तूट आली की रक्कम स्वतःच्या खिशातून भरा नाहीतर निलंबन आहेच!

जितक्या एसटीच्या गाड्या मोडकळीला आलेल्या आहेत, त्याहीपेक्षा जास्त एसटीच्या कर्मचाऱ्यांची आयुष्य फाटलेली आहेत. तुटपुंज्या पगारावर वर्षानुवर्षे काम करत एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रवाशांची व सामानाची ने-आण केलीय. पण याबदल्यात त्यांना ना व्यवस्थित पगार मिळाला, ना काही सोयीसुविधा. दिवसेंदिवस एसटीची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे कारण भ्रष्टाचार करण्यासाठी हे महामंडळ एक चांगले कुरण आहे. आणि प्रत्येक सरकारने कधीही एसटीला फायद्यात चालवावे यासाठी कसलेही प्रयत्न करायचे नाहीत यावर एकमत ठेवलंय.

गेले 2 दिवस, ऐन दिवाळीत एसटीचा संप चालू असताना सरकारला त्यामुळे होणारी गैरसोय दिसतच नाहीये. एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे याचा विसर सरकारला पडलेला दिसतोय. म्हणूनच कुणी शहाण्या मंत्र्याने त्यावर थोडीही काळजीपूर्वक भूमिका घेतली नाही. दिवाकर रावते म्हणतात की "सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. अजून 25 वर्षे तुम्हाला सातवा वेतन आयोग देता येणार नाही." वेतन आयोग दर दहा वर्षांनी येतो याची रावतेंना कल्पना नाहीये का? आणि पुढची 25 वर्षे तेच परिवहनमंत्री असणार आहेत हे काय त्यांच्या कपाळावर लिहिलंय का? ज्या सरकारकडे शिवाजींचा पुतळा उभारायला 3600 कोटी रुपये असतात, सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करायला द्यायला 300 कोटी रुपये असतात तिथे एसटी सारख्या सामान्य माणसाच्या अत्यावश्यक गोष्टीला द्यायला पैसे नाहीत? ही मुजोरी येते कुठून?

रावतेंच्याच पावलावर पाऊल ठेवून चंद्रकांत पाटील साहेब म्हणतायत की लोक एसटी कर्मचाऱ्यांना ठोकून काढतील. मंत्रीमहोदयांना एक आवर्जून सांगावे वाटते की इथले लोक गरीब व अशिक्षित दिसत असले तरी मूर्ख नाहीयेत की तुमच्या सरकारच्या पापाची फळं ते सामान्य एसटी कर्मचाऱ्यांना भोगायला लावतील. पाटील साहेब, तुम्ही निश्चिन्त राहा, कुठेही एसटी कर्मचाऱ्यांना सामान्य महाराष्ट्रीय माणूस मारहाण करणार नाहीये. पण, तुम्ही व रावते साहेब मिळून संप मिटवण्याऐवजी संप चिघळण्याची शक्यता जास्त होईल अशी वक्तव्ये करत राहिलात तर तुमचे पुढच्या वेळी निवडून येणे अवघड राहील. सत्तेत आल्यावर सामान्य माणसाला सामान्य एसटी कर्मचाऱ्याचा अंगावर सोडून आपण शांतपणे तमाशा बघावा हे तुमचे स्वप्न साकार होणार नाहीये. 25 वर्षे सोडा, 25 महिन्यांनी तुमच्याकडे ही खुर्ची असेल का याची चिंता करा!!

- डॉ. विनय काटे

Saturday, October 14, 2017

जपानच्या सेवेत भारतीय अष्टप्रधान मंडळ

प्रिय शिंजो आबे (प्रधानसेवक, जपान) काका,

भारतातून 3 लाख युवकांना जपानला नेऊन त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन त्यातल्या काहींना तिथेच नोकरी देणार असला काही करार तुम्ही जपानी लोक आमच्या देशाशी करताय हे ऐकायला मिळालं. मला एक कळलं नाही की विश्वगुरु असणाऱ्या आमच्या देशातल्या युवकांना काही शिकवायची तुमची लायकी तरी आहे का? एकतर तुमची लोकसंख्या टीचभर, त्यामुळे "मेरे सवासों करोड देशवासीयों.." म्हणण्यातला गर्व तुम्हाला कधी कळणार नाही. त्यात तुमच्या एका येनला आमच्या ६० पैशाची किंमत (तुमचा GDP असेना का आमच्या अडीचपट, आम्हाला त्याच काय?), तुमच्या बुलेट ट्रेनच्या आधी कित्येक युगे आम्ही विमाने आणि अण्वस्त्रे बनवली आणि तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवणार?

आबे काका, तुमच्या भल्यासाठी सांगतो, आमचे 3 लाख युवक तिकडे नेण्यापेक्षा तुमच्या मागास देशाला आमच्या देशासारखा विश्वगुरु बनवण्यासाठी आम्ही आमच्या देशातील काही महान व्यक्तिमत्वे तुमच्याकडे "अष्टप्रधानमंडळ" या जबाबदारीवर कायमची पाठवायला तयार आहोत. त्यांचे कर्तृत्व ऐकून नाही तुमच्या घशात मोमो अडकला तर नाव बदलून ठेवेन स्वतःचे! आता हे अष्टप्रधानमंडळ बघा -

१) नरेंद्र मोदी - जगातल्या प्रत्येक देश आणि गाव हे त्यांचं "दुसरं घर" आहे आणि प्रत्येकाशी त्यांचा जुना संबंध आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला लाखोंची गर्दी होते आणि सोबत रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी! अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, कला, साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास, भूगोल आदी प्रत्येक गोष्टीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या दरवर्षीच्या "Vibrant Gujrat" मेळ्यात लाखो कोटी डॉलर्सचे MoU परकीय लोक करतात ("प्रत्यक्षात रुपया येत नाही" हे काय सांगताय आम्हाला?), त्यांनी गुजरातचा इतका विकास केला की भारतातल्या साऱ्या कंपन्या आणि शिकलेले लोक मुंबई, बंगलोर, दिल्ली, पुणे, हैद्राबाद सोडून आता फक्त अहमदाबादला जायला आतुर आहेत. तुमच्या टोकियोपेक्षा महाग फ्लॅट व जमीन अहमदाबाद मध्ये आहे. आणि आमच्या मोदीजींनी 70 वर्षे न सुटलेल्या आतंकवाद, काळे धन, स्त्रीभ्रूणहत्या अशा कित्येक समस्या नुसत्या सेल्फी घेऊन व रात्रीत नोटबंदी करून सोडवल्या आहेत. तूम्ही तुमच्या जागी मोदींना बसवा आणि बघा, गेल्या 70 वर्षांत तुम्हाला जे जमलं नाही ते आमचे मोदीजी चुटकीसरशी करून दाखवतील.

२) योगी आदित्यनाथ - वैराग्य आणि सत्ता यांचा इतका सुरेख संगम तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जपानमधल्या वेगवेगळ्या मठातील साधूंना ते लवजिहाद थांबवणे वगैरे कामे देऊन त्यांना काही कामाला तरी लावतील. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागतिक दर्जाची हॉस्पिटल कशी चालवायची हे ते तुम्हाला शिकवतील. उगी तुमच्या लोकांना आजारपणाच्या उपचारासाठी गोरखपूरला यायची गरज नाही पडणार.

३) अरुण जेटली - अर्थशास्त्राचे यांचे ज्ञान इतके अगाध आहे की विचारू नका. रात्रीत केलेल्या नोटबंदीचे समर्थन कसे करावे, GST च्या गोंधळाला नावाजावे कसे हे ते तुम्हाला शिकवतील. त्यांच्या निर्णयांना विरोध करणारे लोक कसे संकुचित, छिद्रान्वेषी आणि राष्ट्रद्रोही आहेत हे ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकतात ते. ते तुमच्या अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकतील.

४) मोहन भागवत - तुमच्या देशाच्या दुःखाचे खरे कारण म्हणजे तुमची कमी असणारी लोकसंख्या आहे हे ते पटवून देतील. एका बाईने चार मुले जन्माला कशी व का घालावी यावर ते जपानी बायकांचे प्रबोधन करतील.

५) सुषमा स्वराज - उत्तर कोरियाच्या किम जोंगला व त्याच्या मिसाईलला घाबरायची गरज तुम्हाला पडणारच नाही. यांना घेऊन जा आणि बघा "एक मिसाईल के बदले दस मिसाईल" कशा सोडतात त्या ते.

६) राजनाथ सिंग - प्रत्येक कायदा सुव्यवस्था बिघाडणाऱ्या घटनेवर काहीही न करता निष्काम कर्मयोगाने "कडी निंदा" कशी करावी याचे सुंदर प्रात्यक्षिक ते तुम्हाला देतील. त्यांच्या कड्या निंदेने मतपरिवर्तन होऊन दाऊद इब्राहिम, हाफिज सईद वगैरे अतिरेकी व भारतातले नक्षलवादीही आजकाल अहिंसेच्या मार्गाने जाण्याच्या विचारात आहेत.

७) अनिल बोकील - इंजिनिअरिंग करून बेरोजगार राहण्यापेक्षा "हौशी अर्थशास्त्रज्ञ" बनून देश बदलता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे बोकील तुमच्या देशातल्या बेरोजगार इंजिनिअरना अर्थपूर्ण कामाला लावून तुमच्या देशातही अर्थक्रांती आणतील.

८) धर्मेंद्र प्रधान - अमेरिकेत आलेल्या वादळाने भारतात पेट्रोलचे भाव वाढतात हे महान संशोधन करणारे प्रधान भौगोलिक, खगोलीय घटना आणि त्याचे तेलाच्या किंमतीवर होणारे परिणाम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून तुमचे अब्जावधी येन येनकेनप्रकारेण वाचवतील.

शिंजो आबे काका, आमच्या देशात कुणाला काहीही देताना चांगले देतात. सबब कमी शिकलेले तीन लाख युवक तिकडे पाठवून तुमचा खर्च वाढवण्याऐवजी आम्ही हे अष्टप्रधानमंडळ तुमच्याकडे कायमचे पाठवायला तयार आहोत. मला माहित आहे की यात आमचे फार मोठे नुकसान आहे पण तुम्ही नाही का आम्हाला बुलेटट्रेन फुकटात दिली, म्हणून हे अष्टप्रधान मंडळ आम्ही तुम्हाला फुकटात देऊ इच्छितो. त्यांच्या जपानला जाण्याने आमच्या देशाचे होणारे संभाव्य नुकसान आम्ही कसेतरी भरून काढू. आणि आमचे अष्टप्रधान मंडळ तिकडे गेल्यावर हे जपानला जाणारे तीन लाख युवक भारतातच नोकरीला लागतील याची आम्हास खात्री आहे!

तेव्हा आबे काका अजिबात उशीर करू नका. पुढच्या विमानाने ह्यांना घेऊन जा आणि जपानला विश्वगुरू बनवून टाका. आम्हाला आता विश्वगुरू बनून राहायचा कंटाळा आलाय.

तुमचा शुभचिंतक -

डॉ. विनय काटे

Wednesday, October 4, 2017

आयुष्य सुंदर आहे!

४-५ हजार वर्षांपूर्वीचे राम-कृष्ण, अडीच हजार वर्षांपूर्वीचे बुद्ध-महावीर, दोन हजार वर्षांपूर्वीचा येशू आणि दीड हजार वर्षांपूर्वीचा पैगंबर हे लोक त्यांच्या काळात, त्यावेळच्या समाजात खूप मोठे दार्शनिक/तत्त्ववेत्ते व विवेकाचा आवाज असतीलही. पण, आजच्या काळातल्या समस्त प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे निश्चितच नाहीयेत. प्रत्येक क्षणाला तंत्रज्ञानामुळे जग लहान होत चाललंय, विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र येतायत, नवीन प्रकारच्या मानवी क्रिया-प्रतिक्रिया निर्माण होतायत. आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाला नवनवीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, तात्विक स्वरूपाच्या मानवी समस्या निर्माण होतायत.

या समस्या जर फक्त विशिष्ट धर्माच्या नितीमूल्यांनी आपण सोडवायला गेलो तर जगात फक्त धार्मिक/सांस्कृतिक लढे होतील, आणि ते आता होताना आपण पाहायला लागलोय. दुसऱ्या व्यक्तीला, धर्माला किंवा संस्कृतीला आम्ही tolerate (सहन) करतो किंवा आम्ही tolerant आहोत हेच मुळात दर्शवते की आम्हाला दुसरी व्यक्ती, त्याचा धर्म किंवा संस्कृती रुचत नाही. फक्त आम्हाला त्याच्याविरुद्ध काही करता येत नाही म्हणून आम्ही ते tolerate करतो. पण जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही आमच्यातले जनावर बाहेर येऊ देतो आणि दुसऱ्या माणसाला त्याच्या जाती, धर्म, देश, संस्कृती आदी गोष्टींवरून एखाद्या ठिकाणाहून हुसकून लावतो, बहिष्कृत करतो, बलात्कार करतो व प्रसंगी जीवही मारतो. आणि हे करायला आम्हाला धर्म किंवा राष्ट्रवाद एक फसवे नैतिक अधिष्ठान देतो.

धर्माच्या, संस्कृतीच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली आम्ही दुसऱ्या माणसाचे अस्तित्व संपवायला थोडेही मागेपुढे पाहत नाही. आमच्या मनात कधीही हा विचार चुकूनही येत नाही की ज्या धर्माची, देशाची किंवा संस्कृतीची पताका आम्ही खांद्यावर घेतलीय, त्या धर्मात, देशात, संस्कृतीत आमचा जन्म एका अपघाताने झालाय, तो काही आम्ही निवडलेला नाही. म्हणजे मला हिंदू, मुस्लिम वगैरे म्हणूनच आणि त्यातही भारत देशातच जन्मायचं होतं असं ठरवून कुणीही जन्मत नाही. पण मग जन्मल्यापासून आपलाच धर्म, देश, संस्कृती श्रेष्ठ हा अहंकार आपल्या नकळत्या मेंदूत मोठ्या व्यक्तींकडून ठासून भरला जातो. आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या मुर्खपणे सुरू राहते.

गंमतीचा भाग हा की बहुसंख्य लोकांना या धर्माच्या, देशाच्या, संस्कृतीच्या जोखडातून मुक्त व्हावे वाटते. पण संख्येने कमी असणाऱ्या कट्टर अभिमानी लोकांना काय वाटेल, ते आपल्यावर रागावतील, आपल्याला बहिष्कृत करतील याचा विचार करून भीतीने हे बहुसंख्य लोक निमूटपणे या व्यवस्थेत आपला सहभाग चालू ठेवतात. ही कळपाची मानसिकता माणसाला स्वतंत्रपणे आयुष्य कधी जगूच देत नाही. आपल्याला जर खरेच ह्या जगात शांतता पाहायची असेल तर सर्वांनाच ह्या धर्मप्रेमाच्या, राष्ट्रवादाच्या, सांस्कृतिक अभिमानाच्या बेड्या आपल्या हातापायांतून काढून फेकून स्वतःला व दुसऱ्या माणसाला फक्त माणूस म्हणून पाहावे लागेल. याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. मी तरी ह्या स्वातंत्र्यात आनंदाने जगायला सुरुवात केलीय, कारण कुठल्यातरी देव, देश, धर्म व संस्कृतीसाठी स्वतःच अमूल्य आणि एकदाच मिळणारे मानवी आयुष्य वाया घालवणे मला योग्य वाटत नाही. तुम्हाला जमतंय का बघा!

- डॉ. विनय काटे

Thursday, September 28, 2017

Hugh Hefner - अमेरिकन प्लेबॉय

1940-50 च्या दशकात हॉलीवूडच्या सिनेमात नवरा-बायकोचे पात्र साकारणारे नट आणि नटीसुद्धा एका बेडमध्ये दाखवले जात नसत इतका संकुचितपणा अमेरिकन समाजात होता. त्याकाळी Esquire नावाच्या त्यावेळच्या सर्वात जास्त खपाच्या पुरुषांच्या मासिकात ह्यु हेफनर कॉपीराईटर म्हणून काम करायचा. 1952 साली फक्त 5 डॉलरने पगार वाढवावा म्हणून त्याने केलेली मागणी मासिकाने धुडकावून लावली आणि ह्युने नोकरी सोडली. कर्ज काढून 600 डॉलर, स्वतःच्या आईकडून 1000 डॉलर आणि अजून काही गुंतवणूकदारांकडून उरलेले असे एकूण 8000 डॉलर जमा करून पुढच्याच वर्षी 1953 साली ह्युने स्वतःचे मासिक सुरू केले, नाव होते "Playboy". हे नावसुद्धा आधी वेगळे ठरवले होते पण कॉपीराईटच्या समस्येमुळे अगदी शेवटच्या क्षणी प्लेबॉय या नावावर शिक्कामोर्तब केले गेले.

प्लेबॉयच्या पहिल्या कव्हर फोटोसाठी ह्युला एक खास फोटो हवा होता. त्यासाठी असंख्य पिन-अप गर्ल्सचे फोटो त्याने नजरेखालून पाहिले पण त्यातला एकही त्याला पसंत येईना. त्यावेळेस त्याला कळले की मेरिलीन मोन्रोने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक न्यूड फोटोशूट केले होते व ते फोटो अजून कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. मेरिलीनच्या सौंदर्याने तेव्हा अख्ख्या जगाला भुरळ पाडली होती व तिचे नाणे हॉलीवूडमध्ये चालायचे. ह्युने त्या फोटोग्राफर कडून अत्यंत चलाखीने मेरिलीनच्या एका नग्न फोटोचे हक्क विकत घेतले, आणि ते झाले प्लेबॉयच्या पहिल्या अंकाचे कव्हर! हातोहात प्लेबॉयच्या 50,000 प्रती खपल्या आणि प्लेबॉय हे नाव जगभराला माहीत झाले. पुढे अवघ्या 2-3 वर्षात प्लेबॉयने Esquire ला सुद्धा खपाच्या बाबतीत मागे टाकले.

प्लेबॉयचा प्रत्येक अंक ह्यु स्वतः संपादित करायचा, आणि त्यात लिहायचा सुद्धा. प्रत्येक अंकाचे डिझाईन हे ह्युच्या नजरेत निर्दोष असल्याशिवाय तो अंक छापला जायचा नाही. लाइफस्टाइल, कला, साहित्य, राजकारण, विज्ञान, रहस्यकथा, मानवी हक्काचे लढे, खेळ, फॅशन, सेक्स अशा विविध विषयांबद्दल मते, माहिती देणारे धाडसी लेख ह्युने कशाचीही पर्वा न करता छापले. ह्युने प्लेबॉयसाठी घेतलेल्या महान नेत्यांच्या व कलाकारांच्या मुलाखती तर विशेष गाजल्या. वर्णद्वेषाविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या माल्कम एक्स आणि अहिंसेने लढा देणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, या दोघांच्या बेधडक मुलाखती ह्युने घेतल्या व छापल्या. फिडेल कॅस्ट्रो पासून जॉन लेनन पर्यंत जगप्रसिद्ध लोक ह्युच्या प्लेबॉयशी कसलाही आडपडदा न ठेवता व्यक्त झाले.

प्लेबॉय मासिकाच्या यशानंतर ह्युने स्वतःचे प्लेबॉय क्लब जगभर उभे केले. तिथे काम करणाऱ्या वेट्रेस मुलींना Bunny म्हणतात. या बनीजचा ड्रेस डिझाईन करण्यातसुद्धा ह्युचा सिंहाचा वाटा होता. ग्राहकाला कसे बोलावे, ड्रिंक कसे द्यावे यासाठी बनीजचे खूप उच्चप्रतीचे ट्रेनिंग झाले होते. जेव्हा पहिल्यांदा बनी बनण्यासाठी ह्युने जाहिराती दिल्या तेव्हा तिथे ऑडिशन देण्यासाठी अख्ख्या अमेरिकेतून आलेल्या मुलींची झुंबड उडाली. प्लेबॉय क्लब हे जगप्रसिद्ध झाले होते. पूढे याच बनीजना त्याने प्लेबॉयच्या कव्हरवर सुद्धा स्थान दिले आणि त्यातून कित्येक सुपरमॉडेल, अभिनेत्री हॉलीवूडला मिळाल्या. याच्या पुढचा भाग होता "Playboy Mansion". ह्युने स्वतःच्या भल्यामोठ्या घरालाच एका क्लबमध्ये बदलून टाकले जिथे तो कामही करायचा आणि जगभरातून आलेल्या सेलेब्रिटीचे आदरातिथ्यही करायचा. त्याच्या मँशन मध्ये प्रवेश मिळावा म्हणून मोठेमोठे सेलेब्रिटी, राजकारणी, बिझनेसमन लोक वाट पाहत राहायचे. त्यानंतर एक पाऊल पुढे जात ह्युने स्वतःचे भलेमोठे विमानही विकत घेतले आणि प्लेबॉयच्या स्टाईलने प्रवास करायला जगभरातून लोक त्यात दाखल झाले.

जेव्हा अमेरिकेतला वर्णद्वेषी श्वेतवर्णीय समाज काळ्या कलाकारांना मंच नाकारत होता, तेव्हा ह्युने प्रवाहाच्या विरोधात जायची मोठी जोखीम घेत त्या कलाकारांना प्लेबॉय मासिकात, टीव्हीवर आणि त्याच्या प्लेबॉय क्लबमध्ये व्यक्त व्हायची संधी दिली. ह्युचे हे सगळे प्रयोग क्रांतिकारी, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते. मॉडेलच्या नग्न फोटोंमुळे ह्युवर फेमिनिस्ट लोकांनी भरभरून टीका केली पण त्यामुळे ह्युने कधी त्यांचा राग केला नाही, उलट त्याने खुलेपणाने त्याच्या घोर विरोधी असणाऱ्या महिला पत्रकारांनासुद्धा दिलखुलास मुलाखती दिल्या. गे लोकांचे हक्क असोत, गर्भपाताला समर्थन असो, फेमिनिझम असो की व्हिएतनाम युद्धाला विरोध असो, ह्युने प्रत्येक वेळी धाडसी, प्रवाही आणि भविष्यवेधी भूमिका घेतल्या. एकीकडे व्हिएतनाम युद्धासाठी सरकारला विरोध करत, दुसरीकडे त्याने व्हिएतनाम मध्ये अडकलेल्या अमेरिकन सैन्याचे मनोबल वाढवायला स्वतःच्या विमानाने त्याच्या सुंदर प्लेमेट (मॉडेल) प्लेबॉयचा नवा अंक घेऊन पाठवल्या. सरकारी धोरणाला विरोध आणि पण सरकारच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा आदर हे दोन्ही तो एकाचवेळी अत्यंत सभ्यपणे करत होता.

हे सगळे होत असताना ह्युला उत्तान चित्रे छापली म्हणून अटकही झाली. प्लेबॉय क्लबसाठी त्याने एका शहराच्या मेयरने मागितलेली लाच दिली म्हणून त्याच्यावर खटलाही झाला, पण त्याने प्रामाणिकपणे स्वतःची चूक मान्य करत स्वतःचे साम्राज्य वाचवले. ह्युच्या मदतनीस मुलीवर ड्रग्ज विकल्याचा खोटा आरोप ठेवून ह्युला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ह्यु पुरून उरला. त्याचे व्यक्तिगत आयुष्य अत्यंत घडामोडीचे राहिले. पहिल्या घटस्फोटानंतर ह्युने कधीही लग्न केले नाही, पण त्याच्या आयुष्यात असंख्य स्त्रिया येत जात राहिल्या. या सगळ्यात ह्युने प्लेबॉयच्या साम्राज्याला कुठेही धक्का लागू दिला नाही. Esquire सारख्या सेक्स मॅगझीनला टक्कर देत, लाइफस्टाइल मॅगझीन हा नवा प्रकार ह्यु हेफनरने प्लेबॉयच्या रूपाने जगापूढे आणला व त्याला व्यावसायिक यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. एक हाडाचा उद्योजक, एक धडाडीचा संपादक, लेखक आणि विविध चळवळींना जगासमोर ठेवणाऱ्या ह्युने अमेरिकेच्या सांस्कृतिक व राजकीय जाणिवा मुळापासून हादरवून सोडल्या, नव्याने परिभाषित केल्या.

आज महान Playboy Hugh Hefner वयाच्या 91 व्या वर्षी निधन पावला. त्याच्या पहिल्या कव्हर गर्लच्या मेरिलीन मोन्रोच्या थडग्याशेजारीच ह्युला दफन केले जाईल. "Life is too short to be living someone else's dream." हे स्वतःचे शब्द ह्युने शेवटच्या क्षणापर्यंत जगून दाखवले. त्याला Rest In Peace वगैरे मी म्हणणार नाही. जर चुकून स्वर्ग नावाची कल्पना खरी असेल आणि त्यात सुंदर अप्सरा असतील तर "हे स्वर्गस्थ अप्सरांनो, खुश व्हा! तुमचा प्लेबॉय येतोय!"

- डॉ. विनय काटे

Monday, September 18, 2017

सफदर, तू आज हवा होतास!

मी पाच-सहा वर्षाचा असताना 1989-90 सालच्या आसपास दूरदर्शनवर "पढना लिखना सिखो, ओ मेहनत करनेवालों" हे गाणे लागायचे. त्याचे शब्द, संगीत आणि चाल इतकी सुंदर होती की तेवढ्या लहानपणीसुद्धा मी ते गाणे कित्येकवेळा गुणगुणायचो. दुरदर्शनने ते गाणे तेव्हा प्रौढ साक्षरता मोहिमेसाठी वापरले होते. पुढे काही वर्षांनी मला कळले की दुरदर्शनने त्या मूळ गाण्याचा फक्त मुखडा/ध्रुपद वापरला होता व त्या मुखड्यापेक्षाही त्या गाण्याचा अंतरा/कडवी कित्येकपटीने स्फोटक व विचार करायला प्रवृत्त करणारा होता. त्याही काळात प्रसारमाध्यमांचे संपादक सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजर कसे होते हे कळल्यावर वैषम्य वाटले. ते गाणे पूर्ण स्वरूपात खालीलप्रमाणे आहे -

पढ़ना-लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो
पढ़ना-लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो
क ख ग घ को पहचानो, अलिफ़ को पढ़ना सीखो
अ आ इ ई को हथियार बनाकर लड़ना सीखो ।।धृ।।

ओ सड़क बनाने वालो, ओ भवन उठाने वालो
खुद अपनी किस्मत का फैसला अगर तुम्हें करना है
ओ बोझा ढोने वालो ओ रेल चलने वालो
अगर देश की बागडोर को कब्ज़े में करना है ।।१।।

पूछो, मजदूरी की खातिर लोग भटकते क्यों हैं?
पढ़ो,तुम्हारी सूखी रोटी गिद्ध लपकते क्यों हैं?
पूछो, माँ-बहनों पर यों बदमाश झपटते क्यों हैं?
पढ़ो,तुम्हारी मेहनत का फल सेठ गटकते क्यों हैं? ।।२।।

पढ़ो, लिखा है दीवारों पर मेहनतकश का नारा
पढ़ो, पोस्टर क्या कहता है, वो भी दोस्त तुम्हारा
पढ़ो, अगर अंधे विश्वासों से पाना छुटकारा
पढ़ो, किताबें कहती हैं – सारा संसार तुम्हारा ।।३।।

पढ़ो, कि हर मेहनतकश को उसका हक दिलवाना है
पढ़ो, अगर इस देश को अपने ढंग से चलवाना है
पढ़ना-लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो
पढ़ना-लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो!

जवळपास तीस-चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या भारतातील आर्थिक विषमतेविरुद्ध, भांडवलशाहीविरुद्ध, जातीयतेविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आणि एकूणच व्यवस्थेविरुद्ध सामान्य लोकांना जागृत करणारे हे गाणे लिहिले होते सफदर हाश्मीने!

1954 साली दिल्ली मध्ये जन्मलेल्या सफदरने दिल्लीतूनच BA व MA केले. विद्यार्थीदशेपासूनच सफदर कम्युनिस्ट विचारांनी भारलेला होता. अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी "जन नाट्य मंच" ची स्थापना केली, ज्या संस्थेने जवळपास 24 पथनाट्यांचे 4000 प्रयोग सर्वसामान्य लोकांसाठी केले. यातल्या बहुतांश नाटकांचे लेखन व जवळपास सर्वांचे दिग्दर्शन सफदरने केले. त्यातल्या कित्येक पथनाट्यांत त्यांनी स्वतः अभिनयही केला. इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात, त्यावेळच्या भ्रष्टाचाराविरोधात सफदरने "हल्ला-बोल", "कुर्सी, कुर्सी, कुर्सी" अशी अनेक पथनाट्ये केली.

आजच्या काळात कम्युनिस्ट कन्हैय्या कुमारच्या तोंडून "आझादी, आझादी! भूकमरीसे आझादी, सामंतवादसे आझादी!" हे ऐकून सरकारच्या पायाखालची वाळू सरकते व त्याला देशद्रोहाच्या खोट्या केसेसमध्ये गुंतवले जाते. मग तीस वर्षांपूर्वी सफदरने काय त्रास सहन केले असतील याची कल्पनाही करणे शक्य नाही. 1 जानेवारी 1989 ला असेच एक पथनाट्य करत असताना गाजियाबादमध्ये काँग्रेसच्या गुंडांनी सफदरवर खुनी हल्ला केला, ज्यात 2 जानेवारीला इस्पितळात सफदरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अगदी दोनच दिवसांनी 4 जानेवारीला सफदरच्या पत्नीने त्याच्या हत्येच्या ठिकाणी त्याच्या पथनाट्याचा प्रयोग पूर्ण करून स्वतःच्या पतीला श्रद्धांजली वाहिली होती. रात्रंदिवस बातम्यांच्या रतीब घालणारे शेकडो चॅनेल तेव्हा नव्हते म्हणून हे गाणे, ही घटना तेव्हा खूप कमी लोकांच्या माहितीत आली.

आज जर सफदर हाश्मी जिवंत असते तर सडकेपासून संसदेपर्यंत आणि टीव्हीच्या बातम्यांमध्येही हा कवी, नाटककार आजच्या सत्ताधीशांची, विरोधकांची, बिझनेसमन्सची आणि धर्माच्या ठेकेदारांची पिसे काढताना दिसले असते. किंवा कदाचित दाभोळकर, कलबुर्गी यांच्याही आधी गोळ्या खाऊन मेले असते.

सफदर, तू खरंच आज हवा होतास!

- डॉ. विनय काटे