Tuesday, September 5, 2017

भाऊचा गणपती आणि नवबौद्धांतली कट्टरता

भाऊ कदम यांनी घरी गणपती बसवला म्हणून नवबौद्ध समाजाच्या धर्माधिकारींनी त्यांना धर्मातून/समाजातून बहिष्कृत करावे असा निर्णय केला. कारण काय तर गणपती बसवल्याने 22 प्रतिज्ञांचे उल्लंघन झाले. स्वतःला आंबेडकरांचे राजकीय किंवा वैचारिक अनुयायी म्हणवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि डीकास्ट होण्याच्या गप्पा मारणाऱ्या विचारवंतांनीसुद्धा या सामाजिक/जातीय बहिष्काराचे समर्थन केले. भाऊ कदमांकडून या लोकांनी बहिष्काराच्या धाकाने, बळजबरीने जाहीर माफीनामा लिहून घेतला. अशीच काहीशी अवस्था जगताप नावाच्या कुटुंबाची केली गेली ज्यांच्याविरुद्ध दैनिक सम्राटने "गद्दार जगताप कुटुंब..." असल्या आशयाची हेडलाईन केली. त्यांच्याकडून सुद्धा तसाच जाहीर माफीनामा लिहून घेतला गेला.

ज्या 22 प्रतिज्ञांचे उल्लंघन झाले म्हणून हा गहजब केला त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे पूर्वाश्रमीचा दलित समाज जेव्हा बौद्ध झाला तेव्हा ते धर्मांतर करताना त्यांची वेगळी सामाजिक व प्रामुख्याने राजकीय ओळख राहावी म्हणून प्रत्येक धर्मांतरीत व्यक्तीने समाजाशी केलेला एक तोंडी करार होता. हिंदूंचे देव, पुरोहित, सणवार, पूजापाठ न मानणे आणि दारू पिऊ नये, चोरी किंवा व्याभिचार करू नये अशा काहीशा या प्रतिज्ञा आहेत. या प्रतिज्ञा आपण हिंदू नसून बौद्ध आहोत अशी सामाजिक व राजकीय ओळख निर्माण करणाऱ्या आहेत. मूळ बौद्ध धर्मात असल्या कुठल्याही 22 प्रतिज्ञा नाहीत, हा प्रकार फक्त महाराष्ट्रातील नवबौद्ध समाजातच आहे. चार आर्यसत्ये आणि अष्टांग मार्ग हा मूळ बौद्ध धर्म आहे, 22 प्रतिज्ञा नाही!

पण, भाऊ कदमांनी घरी बसवलेल्या गणपतीला केल्या गेलेल्या विरोधाच्या निमित्ताने स्वतःला आंबेडकरवादी किंवा लोकशाहीवादी म्हणवणाऱ्या नवबौद्ध लोकांची कल्हई उतरली आहे. भाऊने त्याच्या घरात कशाची पूजा करावी हा भाऊचा हक्क आहे. त्याच्या घरात घुसून गणपती आहे म्हणून त्याचा सामाजिक बहिष्कार करणे आणि अखलाखच्या घरात घुसून फ्रीजमध्ये गोमांस आहे म्हणून त्याचा खून करणे यात कसलाही फरक नाही. भाऊ कदम असेल जन्माने नवबौद्ध, पण म्हणून त्याने गणपती बसवू नये हे ठरवणारे हे टिकोजीराव कोण? या देशाच्या संविधानाने भाऊला हक्क दिलेला आहे त्याला हव्या त्या देवाची आराधना करण्याचा. त्याने त्याच्या घरी गणपती बसवू द्या, नाहीतर नमाज पडू द्या, तुम्हाला कोण विचारलंय? त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काही त्याला दिलेली भीक नाही, तो हक्क आहे! आणि हा हक्क भारतीय संविधानाने भाऊला दिलाय, कुणी एखाद्या नेत्याने नाही!

स्वतःला आंबेडकरी, संविधानवादी म्हणवणाऱ्या लोकांना भाऊच्या गणपतीने व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा विसर पडावा?? भाऊ सेलेब्रिटी आहे म्हणून व त्याने गणपती बसवून समाजापुढे चुकीचे उदाहरण ठेवू नये म्हणून थेट बहिष्कार टाकणे हा कुठला शहाणपणा? भाऊने बसवलेल्या गणपतीला समांतर म्हणून देवदासी प्रथेचं उदाहरण देताना कुणी हा विचार केलाय का की कुणा स्त्रीला इच्छेविरुद्ध देवदासी बनवलं गेलं तर तो कायद्याने गुन्हा आहे. घरात गणपती बसवणे गुन्हा नाहीये पण एखाद्याला वाळीत टाकणे मात्र गुन्हा आहे! पण तरीही आंबेडकरी विद्वान हा गुन्हा करायला किंवा त्याचे समर्थन करायला पुढे येतायत कारण संविधान आमच्या बाबासाहेबांनी लिहिलं हा दुराभिमान. आमच्या बाबासाहेबांनी म्हणजे थोडक्यात आमच्या जातीत जन्मलेल्या, म्हणजे त्यात जात मानणे ओघाने आलेच.

होय संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय, पण त्याला मान्यता या देशाच्या संसदेने दिलीय आणि या देशाची संसद, संविधान आणि त्या संविधानाने दिलेले मूलभूत हक्क हे कुणाही व्यक्तीपेक्षा मोठे आहेत, अगदी डॉ. आंबेडकरांपेक्षासुद्धा! संविधानाच्या विरुद्ध जाऊन कुठल्याही 22 प्रतिज्ञा कुणा व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाहीत! आणि भाऊने गणपती बसला म्हणून सारे नवबौद्ध परत महार होतील ह्या भीतीने ग्रस्त झालेल्या नवबौद्धांनी आधी हिंदुत्ववादी संघाच्या वळचणीला गेलेल्या स्वतःच्या सगळ्यात मोठ्या नेत्यास, रामदास आठवलेस आधी संघाचा नाद आणि मंत्रीपद सोडायला सांगावे! भाऊ कदमच्या गणपतीमुळे कुणावर महारकी करायची वेळ येणार नाही, पण संघाला शरण गेलेल्या आठवलेंमुळे तो दिवस नक्की येईल.

ब्राम्हणाच्या पोराने जर आंबेडकर जयंती केली साजरी केली तर त्याची आनंददायी बातमी बनवायची. आणि नवबौध्द माणसाने गणपती बसवला की बहिष्कार? एवढी कट्टरता कुठून यायला लागलीय या समाजात? जैन, मुसलमान, पारशी कट्टर होतेच, त्यात आता नवबौद्धांची भर! बौद्धांचे सर्वात मोठे धर्मगुरू दलाई लामा शंकराच्या पिंडीवर दूध वाहून येतात, गुरुद्वारा मध्ये दर्शन घेतात. त्यांना हे नवबौद्ध धर्मगुरू कधी विचारतील का जाब, किंवा करतील का त्यांना बहिष्कृत? तेवढी यांची औकात नाही! आठवलेंना कधी हे लोक वाळीत टाकतील का ब्राम्हणाची बायको केली किंवा भाजपसोबत गेले म्हणून? त्यांची तीही औकात नाही! त्यांची मजल फक्त भाऊ कदम पर्यंतच! का तर भाऊ कदम हा एक सामान्य कलाकार आहे म्हणुन. 2003 साली या भाऊ कदमकडे लोकलच्या तिकीटला पैसे नसायचे असे एका मित्राने सांगितले, त्याच भाऊने आता मुंबईत घर घेतले. या सगळ्या प्रवासात भाऊला काय मदत या नवबौद्ध धर्मगुरूंनी केली??

भाऊ कदम नवबौध्द आहे म्हणून त्याला लोकांनी डोक्यावर घेतले नाही. भाऊ एक चांगला कलाकार आहे म्हणून तो आज तिथे आहे. जातीमुळे होणारा भेदभाव संपून भाऊला आज आघाडीचा नट बनायला जे स्वातंत्र्य आहे ते या देशाच्या संविधानाने, त्यातल्या मूलभूत हक्कांनी दिलंय. सेलेब्रिटी झाला म्हणून त्याचे मूलभूत हक्क संपत नसतात. भाऊ विसरला असेल त्याच्या प्रतिज्ञा, तुम्हाला तर आहेत ना तुमच्या प्रतिज्ञा लक्षात?? आंबेडकर जयंतीला दारू ढोसून नाचताना 22 प्रतिज्ञा कधी आडव्या आल्या नाहीत कुणाला? तेव्हा समाज गेला नाही महारकी करायला? किती तरी मी मी म्हणणारे आंबेडकरवादी आणि बौद्ध महासंघवाले दारू पिताना, व्याभिचार करताना, भ्रष्टाचार करताना मी आणि जगाने पाहिलेत, तेव्हा 22 प्रतिज्ञा कुठे जातात? भाऊ कदमवर टाकलेला बहिष्कार बौद्ध धर्मातील अष्टांग मार्गाच्या, संविधानातील मूलभूत हक्कांच्या किंवा कायद्याच्या विरोधात नाही???

भाऊ, मी स्वतः नास्तिक आहे आणि कुठलाही धर्म मानत नाही. पण, मी आधुनिक लोकशाहीचा, भारतीय संविधानाचा आणि त्यातला मूलभूत हक्कांचा पाईक आहे. वैयक्तिक मला देव किंवा धर्म मान्य नाही, पण तुझ्या देव मानण्याच्या हक्काला जर कुणी गैरसंवैधानिक मार्गाने आडवं येत असेल तर भाऊ मी तुझ्या बाजूने आहे! या देशाचे संविधान व त्या संविधानाने तुला दिलेले मूलभूत स्वातंत्र्य कुठल्याही धर्मापेक्षा, कुठल्याही नेत्यापेक्षा आणि कुठल्याही धार्मिक/जातीय संघटनेपेक्षा मोठे आहेत. तुझ्याकडून धाकदपटशाने लिहून घेतलेला माफीनामा हे नवबौध्द समाजात आलेल्या कट्टरतेचे द्योतक आहे. आणि असल्या समाजातून कुणी तुला बहिष्कृत केले तरी काही वाईट घेऊ नकोस.... त्यात तुझे नुकसान काहीच नाही उलट फायदाच आहे! डिकास्ट व्हायला यापेक्षा भारी संधी नाहीये!!

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment