Thursday, December 29, 2016

खाद्यसाधना

राहत इंदोरीचा एक शेर आहे -
"सियासत में जरुरी है रवादारी(शिष्टाचार), समझता है,
वो रोजा तो नहीं रखता मगर इफ्तारी समझता है।"

माझं तसं आहे. मी कुठलाही धर्म मानत नाही आणि भविष्यात मानायची पण शक्यता नाही. पण तुम्हा लोकांच्या धार्मिक उत्सवाने, कर्मकांडाच्या निमित्ताने बनलेल्या चविष्ट पदार्थांचा आपण मुरीद(याला इतकाच सुंदर पर्यायी शब्द मराठीत नाही) आहे. संक्रांतीची सरमिसळ भाजी, हनुमान जयंतीची गुळ घातलेली गव्हाची खीर, बिरोबाला कापलेल मेंढरु, खंडोबाला कापलेल बोकड, उरफाट्या पंखाचा कोंबडा, ख्रिसमसचा वाईन घातलेला केक, बुद्धजयंतीची खीर, सत्यनारायणाचा शिरा, बालाजीचा लाडू, होळीची भांग आणि धुळवडीच मटण.... भयान मोठी यादी आहे.

तुमच्या धार्मिक परंपरांचा मला शून्य आदर आहे पण तुमच्या खाद्यपरंपरांपुढे आपण नतमस्तक आहोत. हे चविष्ठ पदार्थ बाजूला केले तर तुमचे देव-धर्म-परंपरा एका रात्रीत कोसळतील. एका मुस्लिम मित्राच्या आजीच्या श्राद्धाला खाल्लेलं मटण इतकं जबरदस्त होतं कि "पुढच्या वेळेस कुणी खपलं तर सांग" हे वाक्य बोलणं कसं थांबवलं ते मलाच माहित. माझ्या आजोबाच्या तिसऱ्याला दुखवटा म्हणून केलेलं पिठलं माझ्या बहिणीला आजपण आजोबा आठवायला पुरेसं आहे.

तर आज रमझान सुरु होतोय आणि मी हैद्राबाद मध्ये राहतोय. निर्गुण अल्लाह जरी माझ्यासाठी कुठल्या रुपात प्रकट झाला तरी मी काही रोजा धरणार नाही. पण अल्लाहच्या बंदयासाठीच बनवलेलं हलीम मात्र आता महिनाभर खायला मिळणार आहे. हलीम ही सांगायची गोष्ट नाहीये, तो एक अनुभव आहे. लैंगिक शिक्षणाचा धडा शाळेत शिकणे आणि सेक्स करून पाहणे यात जे अंतर आहे तेच हलीम आणि हलीमच्या वर्णनात आहे. पुढचा अख्खा महिना वेगवेगळ्या भट्टयांमध्ये रात्रभर शिजलेल्या लज्जतदार बोकडांवर जाणार आहे. मॉन्सून आणि हलीम यासारखं शरीराचे आणि मनाचे भोग पुरवणारे जबरी संयुग मी अजून अनुभवलेलं नाहीये.
खात रहा!

- फेसबुक पोस्ट ( ६ जून २०१६, ०९.५७ )

No comments:

Post a Comment