Friday, December 30, 2016

आरोग्य व्यवस्थेची ऐशी की तैशी!!


2008 साली त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) मेणबत्ती, बॅटरीच्या उजेडात बाळंतपणे केलीयत मी आदिवासी बायकांची. बांबूला चादरीची झोळी बांधून त्यात गरोदर बाईला आणत आदिवासी लोक, अंधारात कित्येक किलोमीटर चालत. दऱ्याखोऱ्यात ना मोबाईल ला रेंज होती, ना रुग्णवाहिका. साप, विंचू चावला तरी हीच झोळी करून पेशंटला आणले जायचे. सर्पदंशाची औषधे तर कित्येकदा नसायचीच उपलब्ध, मग अपरात्री कुठली तरी गाडी शोधून पेशंट जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवा हि सर्कस करायची.

एक नर्स मुक्कामी असायची फक्त आणि मी सर्वकाळ उपलब्ध वैद्यकीय अधिकारी. साधीसुधी उपकरणे नव्हती, ना वीज, ना अत्यावश्यक औषधे. असायचे काय तर ट्रकभरून येणारी बनावट कंपन्यांची, निकृष्ट दर्जाची रक्तवाढीची औषधे, तीसुद्धा expiry date महिन्यावर असलेली. अख्ख्या गावाला वाटली तरी पुरून उरतील एवढी निकृष्ट औषधे! जे उपलब्ध असेल ते उपकरण, ते औषध अख्ख वैद्यकीय ज्ञान पणाला लावून त्यातल्या त्यात काहीतरी जुगाड करायचा. सुदैवाने कुणी पेशंट दगावू दिला नाही माझ्या नोकरीत.

अंगणवाडीची तीच अवस्था... बचत गटाच्या बायकांना एका मुलामागे इतके तोकडे अनुदान मिळायचे कि त्यात पोषक आहार आणणे पूर्णपणे अशक्य. त्यात पण भ्रष्टाचार आणि वेळेत बिले न मिळणे. मग त्या बायका भिजवलेले चणे वगैरे गोष्टी त्या बाळांना देणार. कसलं पोषण मिळणार त्याने? आणि कुपोषणाचे आकडे लपवण्यासाठी मात्र सगळे प्रयत्न खालून वरपर्यंत चालू. श्रेणी 3 आणि 4 च्या कुपोषणात कुठले बाळ दिसू नये म्हणून वजन वाढवून लिहिली जायची.

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ यांची राहायची सोय असून नसल्या सारखी. 1960 साली बांधलेल्या मोडकळीस आलेल्या क्वार्टर्स मध्ये राहायचो, जिथे 2 मधल्या एका खोलीला छत नव्हते. वरून धो-धो पाऊस पडायचा आणि त्याचं पाणी माझ्या कॉटखालून वाहायचे. भिंतीला भला मोठा तडा गेलेला कि कधीही वरून टाकलेल्या भरावाच्या मातीत झोपल्या जागी गाढले जावे. नवीन PHC ची बिल्डींग बांधून झाली होती जी आधीच गळत होती म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून मी ताबा घ्यायला सरळ नकार दिला. कॉन्ट्रॅक्टर मी ताबा घ्यावा म्हणून इतरांकरवी लाच द्यायला पाहत होता, पण नाही घेतला ताबा.

गेल्या वर्षी सहज परत त्याच PHC ला चक्कर मारली. वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे गायब. एक नर्स फक्त केंद्र सुरू आहे म्हणून दाखवायला नव्या PHC बिल्डींग मध्ये उपस्थित. बाकी सर्व परिस्थिती जैसे थे !!
हे UP, बिहार चे वर्णन नाहीये.... ठाण्यापासून 90 किमी अंतरावरच्या, राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 12 किमी दूर एका PHC चं आहे. आणि अशा असंख्य PHC महाराष्ट्रात आहेत, ज्यांची प्रशासनाला किंवा सरकारला कसलीही काळजी नाही, मग सत्ता कुणाचीही असो! कुठल्या तोंडाने आपण महासत्ता व्हायची स्वप्ने पाहतो ???

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २७ ऑगस्ट २०१६, १०.१७ )

No comments:

Post a Comment