देव, देश, धर्म आणि व्यक्ती यांच्या अंधप्रेमात आकंठ बुडालेल्या काही लोकांसाठी...
अ) UNESCO
युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची (United Nations) उपशाखा आहे. जगभरातील देशांमध्ये शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक समन्वय साधून शांतता व सौहार्द प्रस्थापित करायच्या हेतूने ती जन्मली आहे, जिचे 195 सभासद देश आहेत. ऐतिहासिक/भौगोलिक वारसा असणाऱ्या वास्तूंचं/जागांच जतन, शैक्षणिक संवर्धन, विलुप्त होत चाललेल्या भाषांचे जतन, सांस्कृतिक वैविध्याच जतन आणि संवर्धन अशा स्वरूपाची कामे UNESCO करते.
ब) Best
एखाद्या व्यक्तीला किंवा उपक्रमाला 'बेस्ट' आहे म्हणताना काही क्षेत्र/निकष ठरवावे आणि सांगावे लागतात, जसं की best actor, best playback singer असे अवॉर्ड्स Filmfare देते किंवा Best CSR Project असे अवॉर्ड सामाजिक क्षेत्रात मिळतात . तसेच कुणाला best ठरवताना कुणीतरी better, good, bad, worse, worst पण असावं लागते कारण best हे नेहमी कुणाच्या तरी तुलनेत असते. Best राष्ट्रगीत किंवा PM ठरवताना कोणते निकष होते, कोण प्रतिस्पर्धी होते, हे कधी ऐकायला मिळालं तुम्हाला???
क ) Best राष्ट्रगीत
साऱ्याच सभासद देशांना त्यांचं राष्ट्रगीत हा अस्मितेचा किंवा कौतुकाचा भाग असू शकतो. "जन गण मन" जसं भारतीय लोकांना चेतवत तसंच "The star-spangled banner" अमेरिकन लोकांच्या मनात तेवढाच अभिमान जागवतं. जसं आपलं राष्ट्रगीत ऐकायला छान वाटतं तसंच "आमार सोनार बांगला" हे बांग्लादेशच राष्ट्रगीत जे टागोरांनीच लिहिलंय, ते पण तितकंच श्रवणीय आहे, आणि तशीच तमाम 195 देशांना त्यांची राष्ट्रगीते श्रवणीय, अभिमानास्पद आहेत. त्यामुळे कुठल्याही राष्ट्राच्या राष्ट्रगीताची तुलना दुसऱ्या राष्ट्रगीताशी होऊच शकत नाही कारण तुलना करायला कसलाही सामायिक, सर्वंकष,सर्वमान्य निकष लावता येणारच नाही.
ड ) UNESCO - Best PM
जी गत राष्ट्रगीताची तीच पंतप्रधानांची. प्रत्येक देश आपल्या भौगोलिक सीमांच्या आत शासनव्यवस्था चालवण्यासाठी पंतप्रधान निवडतो/नेमतो. आणि प्रत्येक PM प्रामुख्याने आपल्या देशाच्या भल्यासाठी काम करतो, जगाचं भलं नंतर येत आणि बऱ्याचदा येतच नाही. आमच्या देशात एखादी चांगली गोष्ट आमच्या PM ने केली म्हणून काय अमेरिकेवर उपकार आहे का? किंवा ओबामानी तिकडे Healthcare Bill आणलं म्हणून आमच्यावर किंवा पाकिस्तान/चीन वर उपकार आहे का? मग कशावर या सगळ्या PM किंवा राष्ट्रपतींची तुलना करायची? अशी तुलना कधीही होऊ शकत नाही कारण परत तेच कि सामायिक, सर्वंकष, सर्वमान्य तौलनिक निकष असूच शकत नाही.
थोडक्यात UNESCO म्हणजे काही 'झलक दिखला जा' किंवा 'सुदृढ बालक स्पर्धा' सदृश स्पर्धा आयोजित करणारा मंच नाहीये जिथे कुणी रिकामटेकडे गायक, नर्तक, नट, हास्यवीर, क्रिकेटर लोक स्वतःच पॅनल बनवून त्यांच्यातच गुरू-महागुरू अशा बिरुदावल्या स्वतःला लावून "ठोको ताली" असली वाक्ये बोलत किंवा उभे राहून, सलाम करून मानवंदना देतील. UNESCO चे काम जगातील विविध देशांना एकत्र बांधणे आहे, असल्या निर्बुद्ध, अतार्किक आणि फुटकळ स्पर्धा/पारितोषिक देऊन देशा-देशांमध्ये वितुष्ट आणणे नाही. प्रत्येक आईबापाला आपले बाळ जसे सुंदर दिसते तसेच प्रत्येक देशाला त्यांचा इतिहास, भूगोल, संस्कृती, नेते यांचा अभिमान आहे. आणि हे सारे अभिमान त्या त्या देशापुरतेच मर्यादित असतात, शेजारी देशांना किंवा जगाला त्यांच कौतुक नसते. तेव्हा उगीच "आमची बाळी जगात देखणी" म्हणत थाळी बडवत नाचू नका, लोक हसतात आपल्या अडाणीपणाला.
एक गोष्ट सदासर्वदा लक्षात राहू द्या की भारत कधीही 'विश्वगुरू' वगैरे नव्हता कारण आपल्याच तोडीची संस्कृती, सभ्यता, कला, विज्ञान इतिहास काळातही इतर ठिकाणी अस्तित्वात होती. आणि आजची आपली सामायिक अक्कल पहिली तर 'विश्वगुरू' सोडाच, पण बहुतांश मानवी विकास निर्देशांकावर (HDI) वर आपण नापास आहोत आणि कित्येक आफ्रिकन देशांपेक्षा पण मागास आहोत. तेव्हा डोळे उघडा, जागे व्हा आणि जगाकडे पहा !
क्रमशः
(सामान्य ज्ञान भाग-२ लवकरच येईल कारण 'सामान्य अज्ञान' अपार आहे)
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २७ जून २०१६, १५.५७ )
No comments:
Post a Comment