Thursday, December 29, 2016

ईष्टापत्ती


लंडनमधल्या एका चर्च मध्ये अशिक्षित आल्फ्रेड झाडलोट करायचं काम करायचा. चर्चमध्ये काम करण्यासाठी किमान highschool तरी पास असणे अनिवार्य होते पण वृद्ध फादरने आल्फ्रेडला सांभाळून घेतले होते. एकेदिवशी वृद्ध फादर निवृत्त झाले आणि नवीन फादर रुजू झाले. नव्या फादरनी आल्फ्रेडला सांगितलं कि आधी झालेली नियमांची पायमल्ली यापुढे चालणार नाही, त्यामुळे आल्फ्रेडने राजीनामा द्यावा. फादरची आज्ञा ऐकत आल्फ्रेडने राजीनामा दिला.

निराश होऊन तो चर्चच्या बाहेर पडला. सिगारेट प्यायची तलफ त्याला झाली आणि तो चर्चच्या रोडवर सिगारेटचं दुकान हुडकू लागला. खूप साऱ्या अंतरात एकही सिगारेट विकणारे दुकान त्याला मिळालं नाही. पोट भरण्यासाठी सिगारेटच का विकू नयेत हा विचार करून त्याने त्याच रोडवर एक सिगारेट-तंबाखूच दुकान टाकलं. अपेक्षेनुरूप दुकान छान चालायला लागलं. त्याच रोडवर दुसऱ्या बाजूला अजून एक दुकान काढलं त्याने, तेही छान चाललं. हळूहळू एकाची दोन, दोनाची चार अशी पुष्कळ सिगारेट विकायची दुकाने त्याने संबंध लंडनभर उघडली.

आल्फ्रेडच्या दुकानातील तंबाखूचा दर्जा उत्तम होता ज्यामुळे जास्त किंमत असून पण लोक त्याच्याचकडे सिगारेट विकत घ्यायला लागले. मालाची मागणी अनेकपट वाढल्यावर मग आल्फ्रेडने हाताने रोल करण्याऐवजी मशीनने सिगारेट रोल करायला सुरवात केली. उत्पादन आणि खप आता कैकपटीने वाढला होता. अवघ्या पाच-सहा वर्षात 'Alfred Dunhill & Co' चा व्यवसाय लाखो पाउंड्स च्या घरात गेला होता. हीच ती Dunhill ब्रँडची उंची सिगारेट जी आजही जगभरात प्रसिद्ध आहे.

एकदा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये एका पत्रकार आल्फ्रेडला बोलला "तुम्ही अशिक्षित असून एवढे मोठे उद्योगपती झालात, शिकलेले असता तर अजून किती तरी मोठा बिझनेस उभारला असतात". गालातल्या गालात हसत आल्फ्रेड म्हणाला, "जर मी शिकलो सवरलेलो असतो ना तर आजही चर्चची फरशी झाडत असलो असतो!"

-  फेसबुक पोस्ट ( ७ जून २०१६, १८.३३ )

No comments:

Post a Comment