Friday, December 30, 2016

वैद्यकीय संस्कृतीरक्षक


मी जिथून शिकलो त्याच मेडिकल कॉलेजमधून माझ्या काही वर्ष आधी बाहेर पडलेले आणि सध्या मिरजेत व्यवसाय करणारे एक डॉक्टर (माझे गुरुबंधु) फेसबुकवर बरेच चांगले लिखाण लिहितात आणि त्यांच्या बहुतांश पोस्ट ला मी like पण करतो. काल त्यांनी जीर्ण/फाटक्या दिसणाऱ्या जीन्स (distressed denim) मुळे जांघेत fungal infection होतात असा काहीसा शोध लावला आणि त्यासाठी गृहितक होतं कि या जीन्स परदेशात लोकांनी वापरून फेकून दिलेल्या असतात. तिथून किलोवर आणून इथे नगावर लोक विकत घेतात आणि त्या जीन्सच्या आधीच्या मालकाला/मालकिणीला काही fungal infection असेल तर ते नव्या मालकाला आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाला होते. त्यांच्या शोधाला हवाला म्हणून त्यांनी Google वर 'used jeans' असा काहीसा सर्च करून पहा असे ठणकावूनही सांगितले. त्या पोस्टवर सामान्यजण आणि दुर्दैवाने काही डॉक्टरही धडाधड likes ठोकत होते, धन्यवाद देत होते.

वास्तव पाहायला गेलं तर, नामांकित ब्रॅण्डच्या आणि अगदी छोट्या कारखान्यांमधून सुद्धा आलेल्या Distressed denim/jeans या जुन्या नसून नव्या असतात. त्या जीर्ण दिसण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियाही सामान्य लोकांना ज्ञात आहेत (खाली comment मध्ये लिंक देतो). कुणाच्याही जुन्या jeans गोळा करून धुवून विकता येत नाहीत कारण त्यात स्टॅण्डर्ड माप, पॅटर्न किंवा रंग अस काहीच देता येणार नाही जे प्रत्येक तयार कपडे विकणाऱ्या कंपनीला quality साठी अत्यंत गरजेचे असते. आणि Google तुम्ही जे दाखवा म्हणेल ते दाखवते कारण ते एक सर्च इंजिन आहे फक्त. मी या दोन्ही गोष्टी त्यांना मुद्देसूद, अत्यंत विनम्रपणे comment मध्ये लिहिल्या तर त्यांनी मला block करून टाकले.

लहानपणी शाळेच्या बाहेर एक गूळ-चिंचेची जराशी अस्वच्छ कॅंडी मिळायची. ती खाऊन मुले आजारी पडू नयेत म्हणून आया पोरांना सांगायच्या की त्या चिंचा महारोग्यांनी बनवल्यात आणि त्या खाल्ल्यात तर तुम्हाला पण महारोग होईल. भीतीने मग मुले ते पदार्थ खायचे नाहीत. आमच्या डॉक्टर नसलेल्या आया आम्हाला घाबरवून काही गोष्टींपासून दूर ठेवून आमचे आरोग्य सांभाळत असत. पण इथे हे डॉक्टर महाशय खरे diagnosis, prevention याबद्दल वैद्यकीय माहिती द्यायची सोडून jeans वर घसरले. जांघेत fungal infection असेल तर औषधांच्या जोडीने सैल कपडे घालावेत, सुती अंतर्वस्त्रे घालावीत, व्यवस्थित आंघोळ करावी, जांघेचा भाग कोरडा ठेवावा, साबण/कपडे/टॉवेल शेअर करू नयेत या काही बाबी सांभाळाव्या लागतात. यातले काहीही न सांगता 'जीर्ण/फाटक्या दिसणाऱ्या जीन्स' वरचा त्यांच्या मनातला राग 'ही जीन्सच सर्व रोगाचे मूळ आहे' या कपोलकल्पित संशोधनाने काढत संस्कृतीरक्षण करतायत. आणि कुणी माझ्यासारखे सत्य कुणी सांगितलं की आहेच block !!

डॉक्टरसाहेबाना त्यांच्या लिखाणाचं पुस्तक काढायचय अस मध्यंतरी त्यांच्याच वॉल वर वाचलं होत. आणि त्यासाठी वाचक भक्त-संप्रदाय पाहिजे आणि भक्तांना रुचेल अशा गोष्टी पण प्रसवल्या पाहिजेत भले त्या काल्पनिक किंवा अवैज्ञानिक का असोत, म्हणून मग माझ्या तार्किक विरोध करणाऱ्या सत्यदर्शी comments पण त्रासदायक आहेत. मला असलं काहीही करायचं नाहीये, माझ्या पोस्ट ला १ like नाही मिळाला तरी मला फरक पडत नाही आणि माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये १ जण जरी नसला तरी मी खुश आहे. त्यामुळे मी माझ्या ज्ञानाच्या कुवतीप्रमाणे माझा वैज्ञानिक/वैचारिक दृष्टिकोन मांडत जाईन आणि त्यावर तुमच्या सभ्य भाषेतल्या वैचारिक/तार्किक/मुद्देसूद टीकेला माझ्या वॉलवर नेहमी जागा राहील. ज्ञान हे प्रश्न विचारल्याने, विरोधाचा आवाज ऐकल्याने आणि विरोधातल्या सत्याला सुद्धा अंगिकारण्याने वाढते. मला हजारोंचा भक्त-संप्रदाय नकोय पण तार्किक विचार करणारा विरोधी/सम विचारी मोजका प्रामाणिक मित्र-परिवार हवाय.

जाता जाता एवढेच सांगेन की धर्मग्रंथ, देव, गुरु, धर्मगुरू, डॉक्टर, कुटुंबीय आणि अगदी शास्त्रज्ञ लोकांनी जरी एखादी गोष्ट सांगितली तरी अंधपणे विश्वस ठेवू नका. प्रश्न विचारा, तर्काच्या कसोटीवर तपासा, सिद्धता मागा आणि निःसंशय खात्री पटली तर स्वीकारा. आधुनिक विज्ञानात न्यूटन, आईन्स्टाईन च्या संशोधनाला सुद्धा तुम्ही खोडून काढू शकता जर तुमच्याकडे बिनतोड तर्क, प्रायोगिक निरीक्षण आणि सिद्धता असेल तर. इथे आधी जन्मला किंवा जास्त पुस्तके वाचली म्हणून कुणी महान होत नाही. आधुनिक विज्ञानात भक्तीला स्थान नाही, प्रश्नांना मात्र सदासर्वकाळ आहे. तुम्हाला बरं वाटावं म्हणून एकही असत्य/अवैज्ञानिक वाक्य मी बोलणार नाहीये!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ०४ जुलै २०१६, १५. १९ )

No comments:

Post a Comment