Friday, December 30, 2016

'भूत'सभेतील अध्यक्षीय भाषण -


येथे लटकलेल्या माझ्या तमाम 'भूत'योनीतील बंधू आणि भगिनींनो,

आजची रात्र बऱ्याच कारणासाठी अ'भूत'पूर्व आहे. वडा-वडांमध्ये विभागलेला आपला समाज आज या इथे एकोप्याने एका वडाला लटकलाय, कारण प्रसंगही तसाच बाका आहे. न 'भूतो' न भविष्यती असे एक संकट समस्त 'भूत' समाजावर आलंय ज्याची इत्यं'भूत' माहिती आता मी तुम्हाला देईनच.

'भूत'काळाच्या सुरुवातीपासून आपण या पारंब्यांना लटकत आलोय. हि वडाची झाडे फक्त आपली होती पण माझ्याआधीच्या 'भूत'पूर्व अध्यक्ष लोकांनी "भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे" म्हणत नको इतकी 'भूत'दया दाखवत खवीस आणि हडळींना इथे शिरकाव करू दिला. आणि आज हे उपरे खवीस, हडळी आपल्या अद'भूत' संस्कृतीला भस्मी'भूत' करायचे महान पातक आमच्या वडावर लटकून करतायत.

यांना म्हणे वेताळाची पालखी काढायचीय आणि त्यापुढे अंगाला वि'भूती' लावून नाचायचे आहे! दिसतो तेवढा साधा उत्सव नाहीये हा, यामागे 'भूत'संस्कृतीला परा'भूत' करायची खेळी आहे. या उत्सवाच्या निमित्ताने यांचे लोंढेच्या लोंढे इथल्या पाया'भूत' व्यवस्था उखडून लावतील. आपली हि महान संस्कृती एक 'भूत'काळ बनून राहील फक्त. आणि आधार'भूत' व्यवस्थेच्या अभावी आम्हाला आमच्या हक्काच्या पारंब्यांवर सुद्धा लटकताना या खवीस, हडळींच्या चेहऱ्याकडे आशाळ'भूत' नजरेने पाहत अनुमती घ्यावी लागेल.

तेव्हा वेळीच जागे व्हा कारण दिवस वैऱ्याचा आहे ! प्रत्येक पारंबीवर, प्रत्येक वडावर आपले प्र'भुत्व' प्रस्थपित करा. तुमच्या अंगी'भूत' शौर्याचे प्रदर्शन घडवत एकेक वड, एकेक पडकी विहीर या उपऱ्या हडळी, खविसांच्या तावडीतून मुक्त करा. तुम्ही आज जर कच खाल्लीत तर 'भूत' समाजाची कबर खोदायला तुम्ही कारणी'भूत' असाल. तुमच्या समोर ठेवलेली भ'भूत' तुमच्या कपाळावर लावून आज शपथ घ्या एका महान संघर्षाची आणि तुटून पडा या उपऱ्यांवर त्यांना कायमचे परा'भूत' करण्यासाठी!!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १२ जुलै २०१६, २१.०९ )

No comments:

Post a Comment