दिवाळीच्या रात्री आकाशातून भारत कसा दिसतो याचा दरवर्षी फोटो काढण्यासाठी आणि आमच्या रामसेतूच्या भंपक कल्पनेला पाठिंबा देण्यासाठीच NASA काम करते अशा गैरसमजात जगणाऱ्या सभ्य स्त्री-पुरुषहो,
National Aeronautics and Space Administration (NASA) ही अमेरिकन सरकारची अंतराळ संशोधन संस्था आहे जशी आपल्याकडे ISRO आहे. अंतराळयान, अंतराळवीर यांना रॉकेटने अंतराळात पाठवणे, हवामानाचे किंवा भौगोलिक बदल अभ्यासणे, अंतराळविज्ञान आणि वैद्यकशास्त्राशी संबंधित संशोधन आणि मोहीमा पार पाडणे इत्यादी कामे नासा करते. दिवाळीतली तुमच्या घरातली रोषणाई किंवा तुमच्या अंगणात पेटवलेले भुईनळे यांच्याशी नासाला आणि पर्यायाने अमेरिकेला काहीही घेणंदेणं नाहीये.
जी अवस्था या दिवाळीवाल्या फोटोची तीच रामसेतूची (Adam's bridge ची). ज्याला आपण रामसेतू म्हणून पुराणाशी जोडून परमेश्वरी कार्य म्हणून पाहतो ते एक नैसर्गिक भूरूप आहे. पृथ्वीवर आज दिसणारे खंड हे सुमारे २० कोटी वर्षापूर्वी खेटून/एकसंध होते. भौगोलिक घडामोडीत गेल्या कोट्यावधी वर्षात हे सगळे खंड एकमेकांपासून दूर जात आजच्या नकाशासारखे दिसतायेत. याला Continental Drift (खंडीय वहन) म्हणतात जे भूगर्भशास्त्रात सिद्ध झालेय. भूकंप, ज्वालामुखी हे सगळे या drift ची देण. भारत आणि श्रीलंका हे दोन देश गेल्या ७ कोटी वर्षांहून अधिक काळापासून भूकवचाच्या India Plate वर एकमेकांना या चिंचोळ्या पट्टीने (तथाकथित रामसेतूने) जोडलेले आहेत, जेव्हा पृथ्वीवर डायनोसॉर फिरायचे आणि रामच काय मानवसुद्धा अस्तित्वात नव्हता. ही India Plate ७ कोटी वर्षांपासून आफ्रिकेपासून विलग होऊन हळूहळू उत्तरेकडे प्रवास करत इथवर आलीय, आणि अजूनही Eurasian Plate ला उत्तरेकडे ढकलतेय म्हणून हिमालयाच्या पायथ्याला भूकंप होतात.
२००५ मध्ये या Adam's bridge ला मध्ये तोडून त्यातून जहाजांना मार्ग करावा अशी योजना भारत सरकारने आखली, जिच्यामध्ये जहाजांचा ४०० किमी आणि ३० तासांचा प्रवास कमी होणार होता. त्यावेळेस प्रमुख विरोधी पक्षांनी आणि धार्मिक संघटनांनी धर्मभावनेला तडा जातोय म्हणून उर बडवून तो 'सेतुसमुद्रम प्रकल्प' बंद पाडला. आजवरच्या कोणत्याही सरकारने, राजकीय पक्षाने ही कधी लोकांना शहाणपण शिकवायचा प्रयत्न केला नाही कारण मतांचा प्रश्न आडवा येतो. धर्माची पट्टी डोळ्यावर बांधून आम्ही फक्त स्वतःच आणि देशाच नुकसान करत चाललोय, तर अमेरिकेसारखे प्रगत देश विज्ञानाच्या जोरावर अतिप्रगत होत चाललेत. NASA च्या नावे भंपक चित्रे खपवून, स्वतःच्या कपोलकल्पित धार्मिक संकल्पनाचे अशास्त्रीय समर्थन करणाऱ्या लोकांचा मेंदू COEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'स्वयम' (वजन-९९० ग्रॅम) या छोटेखानी उपग्रहापेक्षाही लहान असावा अशी राहून राहून मला शंका येते.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २८ जून २०१६, १४.३९ )
No comments:
Post a Comment