Wednesday, December 28, 2016

Black is beautiful !


भारतीय लोकांना गोऱ्या रंगाचे भयाण आकर्षण! कदाचित आमचे सौंदर्यशास्त्र हे हजारो वर्षांच्या गुलामीतून आलंय, ज्यात परकीय गोरे आक्रमणकर्ते हे नेहमी विजयी होते. आर्य-अनार्य या सांस्कृतिक संघर्षाची एक पार्श्वभूमी पण आहे त्याला. 'श्वेत ते सुंदर' या धारणेला आम्ही जन्मल्यापासून कवटाळून घेतो, विचारात आणि वागणुकीत पण.

सख्ख्या किंवा अगदी जुळ्या दोन बहिणीत पण एक रंगाने थोडी सावळी असली कि कुटुंबात सुद्धा गोरी बहीण आकर्षणाच्या केंद्रस्थानी असते आणि सावळी बहीण out of focus, बाहेरच्यांचे तर मग विचारूच नका. आणि ही सततची हेटाळणी, दुय्यम वागणूक काळ्या-सावळ्या लोकांना त्यांचा आत्मविश्वास घालवून घ्यायला भाग पाडते.

राम, कृष्ण, काली किंवा विठ्ठल हे काळे-सावळे देव पूजनीय असताना पण घरात या रंगाचे अपत्य मात्र साऱ्यांना नको असते. पटल नाही ना? मग थोडं आठवून बघा, घरात कुणी स्त्री गरोदर असताना तुम्ही भिंतीवर लावलेली बाळांची चित्रे, एकही काळ बाळ नसते त्यात. घरात कुणाला स्थळ आलं कि bio-data च्या पण आधी फोटो मध्ये मुलीचा काळासावळा रंग पाहून नकार कळावणारे आम्हीच असतो. कारण आम्हाला काळी नातवंडे-पुतणे नको असतात. बाबा सावळा आणि आई गोरी अशा जोडप्याला गोरी मुलगी झाली कि परवलीच कानावर पडणार एक वाक्य "बरं झालं आईचा रंग घेतला पोरीने, नाहीतर....."

"प्रत्येक गोष्ट हि मुबलक मिळावी पण त्वचेमधलं melanin मात्र कमी दे रे देवा!" हि आमची मनस्वी प्रार्थना असते. आणि म्हणूनच जेव्हा गुलझार त्याच्या पहिल्या गीतातुन 'बंदिनी' मध्ये व्यक्त झाला -
"मोरा गोरा अंग लैले,
मोहे शाम रंग दैदे,
छुप जाऊंगी रात ही में,
मोहे पी का संग दैदे |"
- तेव्हा तो एक वेगळं सौंदर्यशास्त्र सांगत होता.

किती लोक या सौंदर्यशास्त्राला स्वीकारतील माहित नाही, पण मी एक व्यक्ती मात्र नक्की पहिली आयुष्यात काळ्या रंगाचा अभिमान असणारी. माझ्या आजीची मैत्रीण पारुबाई; कधी तिच्या दुःखाचे वर्णन करताना म्हणायची, "अशी पिकल्या जांभळावाणी बाई मी, पण माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी कि हो लागला!".
मला तरी कुणाच्या वर्णाने कधी फरक पडला नाही कारण काळ्या विठ्ठलाची- कृष्णाची इतकी सुंदर वर्णने जन्मल्यापासून ऐकली की त्याइतके सुंदर काहीच नाही याची खात्री झाली. किमान माझ्या साठी तरी Black is beautiful   

- फेसबुक पोस्ट (२४ एप्रिल २०१६, १०. १०)  


No comments:

Post a Comment