Wednesday, December 28, 2016

वैभव छाया

फेसबुकने आयुष्यात कुणाला काय दिले माहित नाही, पण मला मात्र अगदी जीवाचे मित्र जोडून दिले. अशाच एका दिवशी वैभव छाया नावाचा अवलिया येथे दिसला. कविता करणारा संवेदनशील मुलगा हे त्याच्याबद्दलच पहिले इम्प्रेशन घेवून तो मित्र यादीत आला. हळू हळू आम्ही मेसेजेस मधून बोलायला लागलो. त्याच्या कवितांनी, फेसबुक वर व्यक्त केलेल्या अनुभवांनी अस्वस्थ केले बऱ्याचदा. फोन वर जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा वयाच्या मानाने त्याचा आवाज जरा जास्तच पोक्त आणि कसलेला वाटला. हळूहळू त्याच्या पोस्ट्स वाचत गेलो तसे उमजत गेले की वयाने जरी हा माझ्यापेक्षा लहान असला तरी अनुभवाने खूप मोठा आहे.

यक्षाने मेघांकरवी प्रेमाचा संदेश द्यावा तसे मी २ वर्षापूर्वी या भावाला हैद्राबादहून विमानाने पाठवलेले हलीम हा माझा पहिला खरा प्रेमसंदेश. आमचे मित्रत्व बंधुत्वापर्यंत नेले आम्हा दोघांना आवडणाऱ्या मांसाहारानेच ! प्रत्यक्षात आमची भेट खूप अलीकडे, अगदी ७-८ महिन्यापूर्वी झाली आणि त्या दिवशी अगदी भरतभेटीचा आनंद झाला. त्यानंतर आता जेव्हाही मुंबईला जातो तेव्हा आधी या भावास माझ्यासाठी वेळ द्यायच्या प्रेमळ धमकीचा फोन करूनच आणि तो सुद्धा हातातली कामे बाजूला ठेवून मी असेल तिथे मला भेटायला येतो.

कवीता, चळवळ, राजकारण, प्रसारमाध्यमे अशा अनेक क्षेत्रात हा माझा छोटा भाऊ चौफेर घोडदौड करतोय. त्याची जिजीविषा आणि विजीगिषु वृत्ती अविचल आणि द्रुष्ट लागण्यासारखी आहे. माझ्या मनात कसलाही संदेह नाही की एक दिवस हा वैभव सार्वजनिक जीवनात खूप मोठ्या पदाला पोचणार आहे. आज त्याचा वाढदिवस आहे, एक आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी पण.

वैभवा, माझ्या लाडक्या भावा … तुझी किर्ती दिगंत पसरो. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, सुख-समाधानासाठी आणि यशासाठी खूप साऱ्या प्रेमळ शुभेच्छा! लव्ह यू  

- फेसबुक पोस्ट ( १७ मे २०१६, ११.१४ )

No comments:

Post a Comment