Wednesday, December 28, 2016

म.फुले, म.गांधी आणि मी !


कुणाच्याही लग्नाला उपस्थिती लावणे हा प्रकार मला थोडासा अवघडल्यासारखा वाटतो. ना मला गर्दी आवडते, ना समारंभासाठीचे विशेष कपडे असतात, ना दागिन्यांचे कौतुक, ना फोटो काढून घ्यायची हौस आणि ना उपवर मुलींसाठी स्थळे शोधून देण्यात रस. आणि त्यात पण मांसाहारी भोजन नसेल तर तिथे करायचे काय हा यक्षप्रश्न असतो. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महाराष्ट्रीय लग्नांना मी उपस्थिती लावलीय संबंध आयुष्यात.

हैदराबाद मध्ये माझा IIM चा जिवलग वर्गमित्र आणि सहकर्मीचं लग्न होतं. तो तामिळ ब्राह्मण आणि मुलगी हैद्राबादी मराठी. मित्राने सांगितले कि पहाटे 5 ला घरच्या मोजक्या लोकांसोबत लग्नसोहळा आणि संध्याकाळी रिसेप्शन. साहजिकच एक नवा अनुभव म्हणून तामिळ पद्धतीच्या लग्नाला उपस्थिती लावायची ठरविली. मी आणि माझ्यासारखाच अजून एक निशाचर मित्र, आम्ही दोघे रात्र जागवून आहे त्या कपड्यांवर पहाटे 4 ला लग्नस्थळी जायला निघालो.

विवाहस्थळी पोचलो तर आश्चर्याचा धक्का बसला. घरचे मोजके लोक हे संख्येने माझ्या अपेक्षेकृत पाच-दहा नसून तब्बल शे-दीडशे होते. आणि त्यात पण विशेष म्हणजे हे सगळे लोक आंघोळ करून, अगदी नटून-थटून पारंपारीक तामिळ पेहरावात होते. थविल आणि नादस्वरम (सनई चौघड्याचा तामिळ भाऊ) च्या संगीतात सारी लगबग चालू होती. आणि त्यामध्ये अस्मादिक टीशर्ट आणि बर्मुडा घालून उभे! लग्नातील प्रत्येकजण चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहत होता आणि शेजाऱ्याला तामिळ, तेलुगू मध्ये कुजबुजत होता कि "हा कोण?". हळूहळू संबंध मांडवात हा 'बगळ्यांचा थव्यात शिरलेला कावळा' हा वराचा मित्र आहे हि माहिती कानोकानी पोचली.

उपस्थित लोक आपादमस्तक नटलेले सुंदर वधू-वर किंवा काही अत्यंत सुंदर करवल्या यांना पाहायचे सोडून टीशर्ट-बर्मुडा मधले आमचे ध्यान वारंवार खालून वरपर्यंत पाहत होते. मार्केटिंग मध्ये शिकलेले 'differentiation' आयुष्यात खरंच किती परिणामकारक असते याची निःसंदेह खात्री त्यादिवशी पटली. जेव्हा 99% लोक जगरहाटीला धरून जगतात तेव्हा ते ना पाळणारे 1% लोक वेगळे आणि उठून दिसतात.

इंग्लंडच्या राजाच्या भारतभेटीतल्या दरबारात फाटक्या शेतकरी वेशात गेलेले म.फुले आणि गोलमेज परिषदे दरम्यान ब्रिटनच्या राणीला भेटायला गेलेले उघडेबंब म.गांधी प्रसारमाध्यमांत जरा जास्तच प्रसिद्ध का झाले याचा अनुभव मी त्यादिवशी जगून घेतला. तुम्हीही घेऊ शकता, खूप मस्त अनुभव असतो हा!

- फेसबुक पोस्ट ( १६ मे २०१६, १८.३२ )

No comments:

Post a Comment