जागतिकीकरणाने संकुचित विचार बदलले नसले तरी आमच्या शाळा मात्र अतोनात बदलल्या. SSC, CBSE च्या जोडीने ICSE बोर्ड पण आले. कधी काळी नुसत्या English Medium या नावाने भारावून जाणाऱ्या आमच्या देशात Play-school, Nursery, LKG, UKG हे पहिलीत जायच्या आधीचे प्रकार पण आले. थोडक्यात बाळ पायावर उभं राहिले कि टाका शाळेत! बर या सगळ्या पहिलीआधीच्या प्रकारांची फी पण थोडी थोडकी नसते! अगदी 40-50 हजारांपासून सुरुवात होते वर्षाला. यावरून आठवले कि मी GMC मिरज मध्ये सबंध MBBS ची फी सुद्धा 30,000 वगैरे भरलीय कारण वर्षाची फी फक्त 6000 रुपये!
ऑफिस मधला एक सहकारी त्याच्या मुलीच्या शाळेचे वर्णन करत होता," क्या स्कुल है भाईसाहब! एक बच्चा तक मर्सिडीज से नीचे वाली कार में नही आता." मी अशा प्रकारची वर्णने फक्त श्रीमंत लोकांच्या मनोरंजनाच्या किंवा डर्बी क्लब बाबतीत ऐकली होती. शाळेच्या बाबतीत हे वर्णन जरा नवीन आणि पचायला जड वाटलं मला, कारण आमच्या लहानपणी ज्या शाळेतली मुले जास्त बोर्डात येत ती शाळा चांगली असे. शाळेत असताना वडील सांगायचे कि श्रीमंत मुलांपेक्षा गरीब पण हुशार मुलांची संगत ठेव. वडिलांना सांगायला हवं कि आता मुले शाळेत नाही क्लबात जातात आणि आई-बाप डर्बी च्या घोड्यासारखे त्यांवर पैसे पण लावतात आजकाल.
या शाळांच्या सहली पण अगदी आंतरराष्ट्रीय बरं का. पंढरपूर मधून गोपाळपूर (विष्णुपद) ला 2 किमी लांब होडीतून गेलेल्या आमच्या गरीब सहली आठवल्या अचानक. पण या सगळ्या प्रकारांपेक्षा मला यांच्या शिक्षणाच आणि त्याच्या गुणवत्तेचं हसू येतं. मोठ्या मोठ्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळणाऱ्या या शाळांमध्ये बरेच शिक्षक/शिक्षिका हे अवघे 12 वी किंवा graduate असतात. डीएड किंवा बीएड चा पत्ता पण नसतो त्यामुळे मुलांचे मानसशास्त्र, शिकवायच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या फुटकळ गोष्टींना इथे वाव नसतो. कुठलंही ज्ञान नसताना फक्त इंग्रजी च्या मुखवट्याखाली आपलं अज्ञान झाकायचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा पण.
Experiential learning च्या नावाखाली अजून एक केला जाणारा अत्याचार म्हणजे project. माझी एक जिवलग मैत्रीण मला सांगत होती कि तिच्या मुलाला landform (भुरुप) बनवायचा प्रोजेक्ट दिलाय. मी म्हणालो, "दे त्याला एक वाळूची पिशवी आणि सांग ओतायला बाई सांगतील तिथे. झालं वाळवंटाच model !". पण नाही, या project ना star मिळतात. मग हे school project आई-बाप करत बसतात आणि मुलांना स्टार मिळवून देतात कारण मुलाचा आत्मविश्वास दुखावू नये म्हणून. Model बनवून आणन्यापेक्षा एखाद्या गोष्टी बद्दल माहिती शोधून ती सर्वांना सांगणे हा चांगला project होणार नाही का? तर नाही, कारण मग शाळेच्या आजूबाजूचे किंवा खुद्द शाळेचे stationary चे दुकान कशावर जगणार??
प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचा uniform आणि तोही शाळेकडूनच शिवून घ्यायचा. शाळेत वेळ कमी पडतो किंवा वैयक्तिक लक्ष देता येत नाही म्हणून त्याच teacher कडे ट्युशन लावायची. छंद सुद्धा आमच्याकडे क्लास लावून जोपासतात... बुद्धिबळाचा क्लास, तबल्याच्या क्लास. आवड म्हणून नाही तर "Me too" या मानसिकते मधून कि माझ्या मुला-मुलीला काहीतरी येत हे मी सांगितले पाहिजे चार-चौघात जर दुसऱ्या कुणी काही सांगितले तर. मग MTS, NTS, Olympiads, Summer Camp, Reality shows, Abacus, Vedic Maths, Spell-Bee, गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या स्पर्धा यांत आम्ही मुलांना ढकलतो त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी. पण आम्ही कधीच विचार करत नाही कि मुलांना काय हवयं, त्यांची नैसर्गिक ओढ कशात आहे?
आमच्या अनाठायी अपेक्षांचं ओझं आम्ही मुलांवर लादतोय. जे आम्हा आई-बापाला जमलं नाही ते मुलांनी करून दाखवावं म्हणजे मग आमचा न्यूनगंड नाहीसा होईल म्हणून आम्ही या बाळांना डर्बीच्या घोड्यासारखे पाळतो आणि स्पर्धांना जुंपून टाकतो. डर्बीची रेस जिंकलेला घोडा आणि हरलेला घोडा दोन्हीही तितकेच पिळवटून निघालेले असतात कारण ते फक्त तोंडातून फेस येईपर्यंत पळालेले असतात चाबूकाचा मार खात. आणि जिंकणाऱ्या घोड्याच्या मालकासारखे आम्ही पालक आमच्या थकून-भागून, बालपण करपून गेलेल्या मुलांच्या कुठल्या तरी स्पर्धेच्या यशाचे गोडवे कॉलर ताठ करून लोकांना सांगत असतो.
आता एक जीवघेणे सत्य ऐका. ज्या शाळेत लाखो रुपये फी भरून, अगदी पालक म्हणून मुलाखत देऊन प्रवेश मिळवून तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना भाराभर स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावता आणि पालक म्हणून आम्ही जे आजच्या काळात योग्य ते करतोय असा समज बाळगून स्वतःचे समर्थन करता अशा सर्व सुजाण पालकांनो - जगातल्या 73 देशांमध्ये केलेल्या 2012 सालच्या सर्वेक्षणात गणित आणि विज्ञान या विषयांच्या आकलनात आमच्या 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा क्रमांक आहे खालून दुसरा म्हणजे 72 वा, अगदी Kyrgyzstan च्या पण खाली (लिंक - http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Indian-students-rank-2nd-last-in-global-test/articleshow/11492508.cms ).
शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्या मुलांवर काय अत्याचार करतोय आणि त्यांचा नैसर्गिक विकास पण कसा थांबवतोय हा विचार करायला वेळ आहेच कुणाकडे? घोकंपट्टीला विद्वत्ता आणि इंग्रजीला संपूर्ण ज्ञान समजून जगणाऱ्या rat-race मध्ये तुमची मुले पहिली जरी आली तरी ती rat च असतील !
- फेसबुक पोस्ट (२७एप्रिल २०१६, १९.१३ )
No comments:
Post a Comment