Wednesday, December 28, 2016

फेसबुकच्या समुद्रातले मंडुक उर्फ आम्ही -


झुक्याने फेसबुक बनवलं लोकांना एकमेकांशी जोडायला आणि स्वतःला व्यक्त करायला. आज जगातला सगळ्यात मोठया लोकसंख्येचा देश कुठला माहित आहे? उत्तर आहे फेसबुक. 165 कोटी (चीनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त) active users (चीन वाले वगळून कारण त्यांच्या देशात फेसबुकला परवानगी नाहीये) चा देश जिथे सर्वाना व्यक्त व्हायला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मज्जा आहे ना!

दोन माणसाना जोडायला बरेच दोर असतात सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, राष्ट्रीय, कलात्मक, साहित्यिक इत्यादी भावना आणि भूमिका. आणि अगदी ह्याच गोष्टींवर वादविवाद करून माणसे एकमेकांपासून तुटतात पण. मग आम्ही काय करतो तर समविचारी लोकांचे कंपू बनवतो या आभासी दुनियेत पण जसे खेडयात वेगवेगळ्या समाजाच्या वस्त्या असतात तशा. आणि आपापल्या कंपूत आम्ही आमचा उदे करत बसतो, डबक्यातल्या मंडुकांसारखा.

फेसबुक वर आम्हाला कुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली की आम्ही पहिल्यांदा बघतो काय तर फोटो (DP आणि cover दोन्ही), फोटो पाहून लग्न ठरणाऱ्या किंवा नाकारणाऱ्या देशात खूप महत्व आहे त्याला! नंतर आम्ही पाहतो नाव (जात, धर्म, देश, भूमिका इत्यादी बरंच काही गृहीत धरता येत त्यावरून stereotype करून), मग शिक्षण-व्यवसाय (कामाला येईल का आपल्या हा?), मग गाव (आपल्याकडचा आहे का?) आणि या सगळ्यातून पण जमेना तर त्या माणसाच्या काही पोस्ट ज्यावरून त्याला जोडावे कि नको याचा final call घ्यायला.
अशा अनेक चाळण्या लावून आम्ही मित्र जोडतो इथे, मनातले सारे आकस, दुराग्रह, कर्मठ भूमिका यांना धक्का न लागू देता. आमचा फेसबुक मित्रपरिवार पण तंतोतंत आमच्याच विचारांचा असतो आणि म्हणूनच आम्हाला नवीन विचार ना ऐकायला मिळतात, ना आम्ही तशी शक्यता शिल्लक ठेवतो. आमचं सार जग आमच्याच एका रंगात रंगलेल आम्हाला आवडतं. झुक्याने इतक्या साऱ्या जिवंत विचारप्रवाहांचा महासागर पोहायला दिलेला असताना आम्ही त्यात पण आमची छोटीशी धार पकडून बसतो.

आम्ही असे का करतो? तर आम्हाला भीती वाटते.
भीती अनोळखी माणसाची - पण फेसबुक वरची माणसे भौतिक अर्थाने तुमच्या घरात घुसत नाहीत.
आमचे खासगी क्षण पाहतील - तुम्ही ते क्षण निवडक लोकांपुरते ठेवू शकता की.
आमच्याशी त्यांचे विवाद होतील - घरातली 4 टाळकी तरी नेहमी एकमत असतात का?

मलाही हा भयगंड असायचाच म्हणून बरीच वर्षे कुणा अनोळखी माणसाला जोडलेच नाही. पण आता त्या एकसुरीपणाला कंटाळलोय म्हणून सगळे मित्र जोडतोय. इथे कुणी मला येऊन इजा करणार नाहीये (त्यासाठी जवळचे लोक पुष्कळ आहेत). आणि कुणा सोबत काय शेअर करायचं हे पण मला कळत (आणि झुक्याने खूप छान privacy setting दिलेत). आणि त्यातून पण कुणी शिवराळ, फालतू आणि त्रासदायक वर्तन केलेच तर शांततेत unfriend/block ची सोय आहेच की.

तेव्हा मंडळी, आता तरी आपली डबकी सोडा आणि न भिता लोकांशी जोडून बघा. मज्जा येते राव नवनवीन गोष्टी, विचार ऐकून. आणि हो जाता जाता एक गोष्ट, फेसबुकवर येऊन लोकांना जोडायला काकू करणे म्हणजे 'ताकाला जाऊन मोगा लपवणे' आहे. कमीत कमी मी तरी तो मोगा लपवणार नाहीये. सगळ्यांच सप्रेम आणि सहर्ष स्वागत आहे माझ्या छोट्याश्या विश्वात !! Welcome !!

- फेसबुक पोस्ट ( २२ मे २०१६, ०७.५८ )

No comments:

Post a Comment