Wednesday, December 28, 2016

नागराज


"प्रत्येक संताला एक भूतकाळ असतो आणि प्रत्येक पापी माणसाला एक भविष्यकाळ असतो" असे म्हणतात. त्याने जाणीवपूर्वक टाळलेल्या त्याच्या भूतकाळातील एका अत्यंत खासगी अध्यायाची वर्तमानपत्रातून आज सार्वत्रिक प्रसिद्धी झाली. इतके दिवस त्याच्या निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांनी हतबल झालेल्या त्याच्या विरोधकांना अगदी हुकुमाचा एक्का हाती लागल्यासारखे वाटले असणार. स्वाभाविक आहे, ओठात एक आणि आचरणात दुसरे अशा भंपक समाजाला सत्य सांगणारे, दाखवणारे कधीही नको असतात. त्यातून प्रेमासाखी तरल, माणसे जोडणारी भावना प्रसृत करणारा माणूस तर अगदीच त्रासदायक या समाजाला.

मग अशा लोकांच्या विचारांना हरवता आले नाही कि त्या लोकांच्या चारित्र्यहनन करायचा मार्ग सगळ्यात सोपा असतो. "कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते साऱ्यांना माहित आहे …. " या त्याच्याच सिनेमातल्या संवादासारखे आम्ही माणसाची किंमत त्याच्या आजच्या वर्तणुकीने करत नाही तर त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या पुर्वेतीहासावरून करतो. म्हणून मग गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा पण त्यांच्या सत्याच्या प्रयोगातील त्यांनी स्वतः प्रामाणिकपणे वर्णन केलेल्या प्रयोगांतील सोयीस्कर गोष्टी आम्ही प्रसिद्ध करून गांधीना बदनाम करत राहतो.

कुठलाही महापुरुष हा जन्मताच महापुरुष नसतो. त्याच्या आयुष्यातील घटना, अनुभव आणि त्यातून आयुष्याला मिळालेली कलाटणी असा तो प्रवास असतो. नदी जशी उगमाला एक छोटीशी धार असते आणि समुद्राला मिळते तिथे विशाल पात्र असते तसेच महापुरुष असतात. उगम बघून नदीचे मोठेपण ठरत नाही तर पात्र बघून ठरते. महापुरुष हा नेहमी आजपासून त्याच्या आयुष्यातील कलाटणी देणाऱ्या वळणापर्यंतच मागे पाहत जायचा असतो. गांधीचा शोध हा "हे राम" पासून आफ्रिकेत रेल्वेच्या डब्यातून फेकल्या गेलेल्या क्षणापर्यंतच पाहावा. उगीच वडील मारत असताना ते बायकोच्या खोलीत होते हे वाचून "गांधी किती वाईट होते?" हे म्हणायला कुठलं शहाणपण लागतं? त्या न्यायाने तर मग या जगात कधीच कुणी महात्मा होणार नाही कधी !

नागराज हा पण एक असा उलट प्रवास करणारा मनस्वी माणूस आहे. कुठल्या निर्मात्या-दिग्दर्शकाने किंवा सेलेब्रिटीने तुम्हाला आजवर सांगितलंय का की मी लहानपणी चोऱ्या करायचो, दारू प्यायचो, गांजा ओढायचो, नापास व्हायचो कि अगदीच वाया गेलेलो होतो ?? नागराज तो तुम्हाला स्वत:हून सांगतो, कुणाची जबरदस्ती नसताना ! २० वर्षापूर्वीचा कुटुंबाच्या-समाजाच्या अधीन असणारा नागराज जरी कुणाशी लग्नकर्ता झाला असेल, किंवा त्याच्या खासगी कारणास्तव तो विवाहसंबंध फलद्रूप नसेल झाला म्हणून वेगळा झाला असेल, तरी त्यावेळचा उनाड पण बंधनातला नागराज आणि आजचा विद्रोही पण शांत नागराज हि दोन पूर्णतः वेगळी माणसे आहेत. त्या काळात कदाचित तो जातपंचायती समोर वाकून परश्याच्या बाप सारखे तोंड बडवून घेवून किंवा काडीमोडाची पोटगी देवून शांत बसला पण असेल. आणि कदाचित त्याचे हेच अनुभव त्याला अस्वस्थ करून 'पिस्तुल्या', 'Fandry' किंवा 'सैराट' सारखे या जात-समाज वास्तवावर हल्ला करणारे चित्रपट बनवायला भाग पाडत असतील. त्याने न गिळलेले आणि न थुंकलेले हे जातींचे, त्यातल्या अन्याय रुढींचे हालाहल त्याच्या सिनेमांमधून तांडव करत या समाजाच्या उरावर नाचत राहत नसावे हे कशावरून?

प्रिय नागराज, हा भारतीय समाज जसा काही बाबतीत विक्षिप्त आहे तसाच प्रामाणिक परिवर्तनाला स्वीकारणारा पण आहे. आम्ही वाल्याचा वाल्मिकी होताना पाहिलंय, अन्गुलीमालाचा संन्यासी होताना पाहिलंय आणि ते आनंदाने, मोकळ्या मनाने स्वीकारलंय पण. मला खात्री आहे कि तू परत तुझ्या नेहमीच्या सहजपणे समोर येवून जे सत्य आहे ते कथन करशीलच आणि हा उठलेला धुरळा तुझ्या शांत पण मनस्वी वाणीच्या वर्षावाने खाली बसवशील परत कधीही न उठण्यासाठी. आणि हा अनुभव पण तुला तुझ्या सकारात्मकते कडेच्या उलट प्रवासाला अजून एक मोठा आणि सकारात्मक धक्का देईल.

नागराज, तू तो शिंपला आहेस ज्याच्या नशिबी आलेल्या वाळूच्या कणाचा पण तो मोती करतोस. तू यातून पण तावून-सुलाखून झळाळून निघशील कनकासारखा जे तू आजवर करत आला आहेस. मला किंवा तुझ्या कुठल्याही सुजाण प्रेक्षकाला तुझ्या भूतकाळाच्या अंधाराशी कर्तव्य नाहीये, आम्ही तुझ्या हातातल्या मशालीच्या उजेडात चालतोय. ती मशाल, तो पोत कुणी कितीही उलटा केला तरी तुझ्या आतील आगीच्या स्वभावधर्माने तू परत वर उफाळून ये आणि हि अंधारी व्यवस्था जाळून खाक करत रहा !!

- फेसबुक पोस्ट ( १३ मे २०१६, १५.१४ )  

No comments:

Post a Comment