Wednesday, December 28, 2016

पुरुषहृदय

"कठीण कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई"
असं एक गाणं आहे. पुरुषांवरचा हा आक्षेप खूप जुना आणि सर्वश्रुत आहे. निसर्गाने स्त्रियांना गर्भधारणा दिली, बाळाला पाजायला स्तन दिले आणि आईचं एक हळुवार मन पण दिलं नव्या पिढीच संगोपन करायला. स्त्रीच्या प्रसववेदना, बालसंगोपणातील कष्ट आणि प्रेम हे खूप दृश्य स्वरूपात व्यक्त होतात म्हणून त्याची नोंद घेणे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामानाने पुरुष तसे रुक्षच वाटतात.

खरं सांगू, पुरुष पण तेवढेच प्रेमळ असतात पण लहानपणा पासून त्यांना रडायचं नाही हे संस्कारांनी शिकवलं जाते. "रडतोय बघ कसा मुलींसारखा" हे वाक्य ऐकून त्याला स्वतःच दुःख आवरत घ्यावे लागते. उत्क्रांती मध्ये स्त्रीकडे कुटूंबाची अंतर्गत व्ययस्था राखायचे काम आले, तर पुरुषाला या कुटुंबाचे बाहेरील शक्तींपासून संरक्षण करायचे काम आले. म्हणून मग अगदी लहानात लहान मुलगा पण आपसूक या जबाबदारी साठी स्वतःला तयार करत जातो. समाजात स्वतःला शक्तीवान, बुद्धिवान म्हणून प्रक्षेपित करत राहतो. आणि कधी कधी समाजात आपलं उपद्रवमूल्य दाखवून समाजातील वाईट लोकांना संकेत पण देतो त्याच्या कुटुंबाच्या वाटेला न जायचे.
कठिणप्रसंगी दुःख, भावना आवरून घेत, त्याचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखवता जबाबदारी पार पडायचं दिव्य पुरुषाला करावं लागते. कारण तो जर हरला, किंवा हरल्यासारखा दिसला तर त्याचे कुटुंब अजून जास्त गर्तेत जाऊ शकते. आर्थिक विवंचना असताना स्वाभिमान आणि परिस्थितीची जाणीव या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत संसाराचा गाडा हाकत राहतो. त्याच्या बनियनची छिद्रे आणि हाताचे घट्टे हे कधी कुणाला तो दाखवतच नाही, त्यामुळे साहित्यातून आई इतका मान बापाला सहसा मिळत नाही.

मुले लहान असताना मुलांसाठी सगळे त्याग करणारा बाप मुले मोठी झाल्यावर कुटुंबात आपल्या स्थानासाठी आधी संघर्ष करतो. आणि नंतर हतबल झाल्यावर मग बायकोच्या मानसिक आधारावर उरलेलं आयुष्य जगतो. त्याच्या दुर्दैवाने म्हातारपणी बायको आधी निवर्तली तर त्याचं भयान एकटेपण त्याला खायला उठते. तो भावनाविवश होऊन मुलांकडे स्वत:चे एकटेपण व्यक्त करू शकतही नाही कि मला सॊबत द्या कारण न रडायचा पुरुषत्वाचा शाप त्याला तेव्हाही असतो. बायको निवर्तलेले वृद्ध खूप काळ जगत नाहीत (याबाबत माझे अनुभव नंतर सविस्तर लिहीन) कारण त्यांच्या आयुष्यातली ती भावनिक पोकळी कुणीच भरू शकत नाही. याउलट स्त्रिया विधवा झाल्यावर मुले-नातवंडे, अध्यात्म यात स्वतःला गुंतवून जगत राहतात.

अगदी स्वतःच उदाहरण द्यायचं झालं तर 'तारे जमीन पर' मधले "माँ" हे गाणे ऐकून मी थिएटर मध्ये माझ्या ज्युनिअर मुलींसमोर सुद्धा रडलो होतो. जेव्हा बाप झालो, तेव्हा एका बाजूला सिझेरियन झालेली operation table वरची बेशुद्ध बायको आणि दुसऱ्या बाजूला रक्ताने माखलेला रडणारा नवजात कबीर या दोघांना पाहत डोळ्यातुन आनंद आणि वेदनांचे अश्रू एकत्र वाहत असताना न रडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा मी फक्त मलाच माहित. कबीर कधी आजारी असताना मलाही दाटून येत असते, पण मला रडायची सोय नसते. साऱ्या उत्कट भावना आतमध्ये दाबून ठेवत, चेहऱ्यावरची रेषसुद्धा हालू न देता आयुष्याचं सुकाणू स्थिर ठेवायचा यत्न मी तेव्हा पुरुष म्हणून करत असतो, नेहमीप्रमाणेच कुणाला काहीही न दाखवता.

- फेसबुक पोस्ट ( २२ मे २०१६, २०.२४ )

No comments:

Post a Comment