Wednesday, December 28, 2016

माझे मदिरापान


लहानपणापासूनच दारू आणि तिला प्राशन करणारे यांचा मला तीव्र राग यायचा. घरातले संस्कार, सरकारी जाहिराती आणि ऐकिवातले काही लोकानुभव यामुळे या पेयापासून मी अंतर ठेवून होतो. मेडिकल कॉलेजला गेलो तेव्हा जे जवळचे सगळे मित्र झाले त्यांच्यात बरेच मदिरापान करणारे होते. त्यांच्या सोबत बार मध्ये जायचो, चकना खायचो पण दारूला तरीही स्पर्श नाही केला. डॉक्टर होवून व्यवसायात पडल्यावरही तोच शिरस्ता. CAT ची तयारी करताना नवीन मित्र-मैत्रिणी बनले ज्यात बहुतेक सर्वच पिणारे होते. तेव्हाही बीअर बार मध्ये बसून दारू न पिता, टिश्यू पेपर वर गणिते आणि puzzles सोडवायचो.

जानेवारी २०११ मध्ये जेव्हा CAT चा निकाल आला आणि साऱ्या IIM चे मुलाखतीसाठीचे कॉल पहिले तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा इतका आनंद झाला जो सहन करणे शुद्धीत तरी शक्य नव्हते. त्या संध्याकाळी लोकाग्रहास्तव Antiquity Blue चा जवळपास निम्मा खंबा संपवला आणि कुणाला काही न बोलता झोपी गेलो. कसलेहि वमन नाही, कसलेही अपशब्द नाहीत किंवा कसलेही अभद्रपण नाही. सकाळी उठले तेव्हा कळले कि माझ्या मनात कुणाबद्दल कटुता नव्हतीच दारू प्यायच्या आधी म्हणून पिल्यावर पण बिचारी मदिरा काहीही वाईट करू शकली नाही.

त्या दिवसापासून ते IIM ला पोचायच्या दिवसापर्यंत पुढचे २ महिने जवळपास रोज आनंदाने दारू पिली. जगातला कुठलाही उंची scotch किंवा whiskey चा प्रकार शिल्लक नाही ठेवला त्या २ महिन्यात. अगदी १ ग्रॅम शुद्ध सोन्याचे कण मिसळलेले tequila shots सुद्धा घेतले. आणि हे सगळे सत्पात्री दान तेव्हा कमावत्या मित्रांनी केलेले त्यामुळे खिशाला चाट नाही एका पैशाची. अहमदाबादला गेल्यावर वाटले की आता काही मिळायची नाही पण तिथेही परदेशी मित्र-मैत्रिणी आणि armed forces वाले सहाध्यायी यांची आमंत्रणे यायचीच. पण बायकोला सांगितले होते कि फक्त काही विशिष्ट २-३ व्यक्तींसोबतच घेईन, त्यामुळे जवळपास साऱ्यांना नकारच मिळायचा माझ्याकडून.

आज पाच वर्षानंतरही मी त्याच निवडक लोकांसोबत वर्षातून ४-५ वेळा मदिरापान करतो. खूप छान आठवणी जागवतो आम्ही. हेमंत कुमारच्या "ये नयन डरे डरे" पासून ज्ञानेश्वरांच्या "जाणे आज मी अजर" पर्यंत सगळे सुंदर रस त्या सोमरसा सोबत आनंदाने भोगून घेतो. 'मापात पाप नाही' या साम्यवादी सिद्धांतापासून ते 'automotive differential' सारख्या शास्त्रीय माहितीपर्यंत बऱ्याच ज्ञानवर्धक चर्चा मी या जिवाभावाच्या लोकांसोबत हातात ग्लास धरून केल्यात. माझ्या जिवलग मैत्रिणी, मानस-भगिनी पण कित्येकदा सोबत देतात पण कधी वाईट दृष्टीने त्यांना पहिले नाही, वागायचे तर दूरच. दारू चढल्या नंतरचा मेंदूच्या दिलेल्या आज्ञा आणि शरीराने त्यावर दिलेला delayed response अनुभवून हसू येते. अगदी मनापासून त्या स्थितीचा आनंद घेतो, नाहीतर एरव्ही हा १.५ किलोचा अवयव जरा जास्तच हुकुमत गाजवत असतो.

मला दारूचे व्यसन नाही कि तिरस्कार पण नाही. दारू पिणाऱ्या लोकांबद्दलचा राग मागेच गळून पडला जेव्हा कळले कि दारू पिवून माणूस वाईट वागत नाही तर वाईट वागणारी माणसे दारूच्या बुरख्याआड लपत असतात; अगदी तसेच जसे काहीजण देव, देश, जाती-धर्माच्या भ्रामक कल्पनांची ढाल करून स्वतःच्या मूर्खपणाच समर्थन करतात. उत्तर प्रदेशात नोकरी करत असताना २००९ साली झाशी ते बांदा असा passenger ट्रेन ने प्रवास करताना हरिवंशराय बच्चन यांच "मधुशाला" वाचल होतं आणि न पिता सुद्धा धुंध झालो होतो त्या महाकवीच्या शब्दांनी. त्या धुंधीच्या बरोबरीची धुंधी जर कुणी मला चर्चेने द्यायला तयार असेल तर हक्काने विचारा "विनय, आज बसायचं का?", कारण दारू फक्त निमित्त आहे, मला आनंदाची नशा द्यायला तुमचे प्रामाणिक विचार आणि निखळ प्रेम पण पुरेसे आहे.

धर्मग्रन्थ सब जला चुकी है, जिसके अंतर की ज्वाला,
मंदिर, मसजिद, गिरिजे, सब को तोड़ चुका जो मतवाला,
पंडित, मोमिन, पादिरयों के फंदों को जो काट चुका,
कर सकती है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला।

चीअर्स ! चांगभल !

- फेसबुक पोस्ट ( १२ मे २०१६, २२.३१ )  

No comments:

Post a Comment