Wednesday, December 28, 2016

जटायू आणि सीता


जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहायच्या आधी काहीश्या काळात श्री. रामदास फुटाणे सरांची एक वात्रटिकांची कॅसेट आली होती 'भारत कधी कधी माझा देश आहे'. त्यातल एक वाक्य पुसटस आठवतंय "सीता आजकाल रोज अशोकवनात जाते, जटायू तिला बसस्टॉप वरच टाटा करतात अशोकवनासाठी" असं काहीसं.

जागतिकीकरणाच्या 25 वर्षानंतर परिस्थिती अजून खूपच बदललीय. घरोघरीच्या सीता आता उंबऱ्याची लक्ष्मणरेषा ओलांडून जगात वावरतायत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि प्रसंगी त्यांना मागे टाकून. मॉल मध्ये security पासून ते fighter pilot पर्यंत आणि शेतमजुरी, कारकुनी पासून ते CEO पर्यंत या सितांनी अर्थव्यवस्थेचा डोलारा हळूहळू स्वतःच्या खांद्यावर तोलून घ्यायला सुरुवात केलीय.

पण आमच्या आतले सूक्ष्म रावण काही बदलायला तयार नाहीत. आसपास दिसणाऱ्या प्रत्येक सीतेवर, तिच्या वागणुकीवर आम्ही मतांची एक पिंक टाकू. तिच्या कपड्यांवर कधी नजर तर कधी अभद्र comment करू. गर्दीमध्ये तिला ओंगळवाणे स्पर्श करू. आणि त्यातून ही सीता जर आमच्यापेक्षा खालच्या पोस्ट वर काम करत असेल तर तिचं मानसिक, शारीरिक शोषण करायच्या संधी आम्ही निर्माण करू आणि त्यात कित्येक वेळेस यशस्वी पण होऊ कारण व्यवस्था अजून पण समतोल नाहीये. तेव्हा अशोकवन अजून पण टिकून आहेत.

मग अशा वेळेस अंतरात विवेकाचा जटायू जिवंत आहे अशा लोकांनी काय करावे? तर न घाबरता संघर्ष करावा सीतेसाठी, आणि सीतेने फक्त धावा न करता थोडा वेळ दुर्गा बनून उभं राहावं या विकृतींच्या मर्दनासाठी. आणि जटायूनां पण एक विनंती अशी कि सीता कुठल्या धर्माची, जातीची, देशाची, आर्थिक स्तराची आहे यावरून आपली सीतेसाठीची संवेदनशीलता ठरवू नका. सध्या तरी या देशातले कायदे सीतेच्या बाजूने आहेत तेव्हा ते वापरून सीतेच रक्षण करा रावणाची पर्वा ना करता आणि मनात रावण येऊ ना देता!

- फेसबुक पोस्ट (२२ एप्रिल २०१६, ०९. ५१)  

No comments:

Post a Comment