Wednesday, December 28, 2016

समजा कुणी तुमच्या बायकोला .....


भारतीय समाजात सगळ्यात वाईट गोष्ट कुठली समजली जात असेल तर ती म्हणजे कुणाबद्दल प्रेम व्यक्त करणे. "मी तुझ्यावर प्रेम करतो/करते" हे वाक्य पण बोलायला मराठीमध्ये अवघडल्यासारखं होत आम्हाला कारण प्रेम हे नेहमी लैंगिक जवळीकीच्या अर्थाने घेतले जाते. म्हणून पाश्चिमात्य लोकांसारखे सहज 'I love you' किंवा 'I love you for this' अशा वळणाची वाक्य आम्ही सहजपणे इथे बोलूच शकत नाही. कारण जिच्यावर प्रेम किंवा कौतुकाचा वर्षाव करावा ती व्यक्ती विरुद्ध लिंगी असेल तर मग स्वतः ती व्यक्ती किंवा आजूबाजूचे लोक अर्थाचा अनर्थ करायला तत्पर असतात.

माझ्या लग्नाला वर्षभरच झालं होत आणि मी अहमदाबाद ला शिकत होतो. स्वाती मंचर (ग्रामीण पुणे) मध्ये माझ्या आई-वडिलांच्या घरी राहून तिचं BA करत होती. भूगोलाच्या विषयाची सहल कुठेतरी गेली होती आणि त्या सहलीत स्वातीला तिच्या एका सिनिअरने एक teddy बेअर भेट दिला ज्यावर 'I love you' असं लिहिलं होतं. नेमका त्याच आठवड्यात मी घरी आलो होतो आणि तो टेडी पहिला. स्वातीने फक्त मला सांगितले कि तिला तो मित्राने गिफ्ट दिलाय आणि हे पण की तो एकच टेडी त्या दुकानात होता. मी शांततेत तिला सांगितले, "हरकत नाही. असू दे तो तुझ्याकडे, फक्त माझ्या वडिलांना वगैरे सांगू नकोस कारण ते जुन्या वळणाचे आहेत आणि तुझ्याच कॉलेजला प्राध्यापक. उगीच ज्या मुलाने गिफ्ट म्हणून हे तुला दिलंय त्याला त्रास नको कारण लोक कशाचा अर्थ काहीही काढतील."

पुढच्या वर्षी स्वाती अहमदाबादला माझ्या सोबत एक वर्षभर राहिली. छान स्टुडिओ अपार्टमेंट पुरवलं होतं IIM ने आम्हाला. सारे मित्र-मैत्रिणी हक्काने घरी यायचे माझ्या जेवायला, चहा पाण्याला. माझ्या मित्रांमध्ये एक परदेशी मित्र पण होता जो माझ्या सोबत बऱ्याचदा घरी पण यायचा. एकदा स्वातीने सांगितले, "हा तुमचा मित्र माझ्याकडे जरा जास्तच प्रेमाने पाहतोय असं मला वाटतंय." परत मी स्वातीला सांगितलं,"कदाचित त्याच्या संस्कृतीनुसार तो सामान्यपणे तुला बघत असेल पण आपल्याला त्यांच्या मोकळ्या वागण्याची सवय नसल्यामुळे त्याचा मोकळा स्वभाव आपल्याला थोडा विचित्र वाटत असेल. त्याने तुला जर काही वेडेवाकडे वाक्य बोलले किंवा त्यापुढे जाऊन काही अयोग्य वर्तन केले तर बिनधास्त तुझ्या राणी लक्ष्मीबाई च्या mode मध्ये जे करायचं ते कर. पण उगीच वाटतंय च्या नावाखाली अवघडल्यासारखे वाटून घेऊ नकोस."

मला आजवर कधीही स्वातीच्या बाबतीत उगीच असुरक्षिततेची किंवा संशयाची भावना कधीच आली नाही कारण आम्ही दोघे पण सगळ्या गोष्टी एकमेकांना व्यक्त करून सांगतो. नात्यात संवाद आणि विश्वास जोपासला तर विसंवाद, असुरक्षितता आणि कलह यांना जागा उरत नाही हा कमीत कमी माझा तरी अनुभव आहे.

- फेसबुक पोस्ट ( ८ मे  २०१६, २२.०७ ) 

No comments:

Post a Comment