Wednesday, December 28, 2016

पावभाजी आणि डेनिम जीन्स


आजकाल या दोन्ही गोष्टी तरुणाई आणि विशेषतः सधन वर्गामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. स्ट्रीटफूड ते नामांकित रेस्टॉरंट मध्ये भारतभरात कुठेही पावभाजी सहज मिळते (पण मुंबईची चव अहमदाबाद मध्ये मिळत नाही हेही खरे). जीन्सची पण तीच अवस्था, अगदी सोसायटी मध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्या पासून रॅम्प वरच्या मॉडेल आणि सुपरस्टार्स पर्यंत सगळ्यांना जीन्स भावते. आणि सामान्यतः कुणाला या दोन्ही गोष्टींमधला संबंध विचाराल तर शक्यता आहे कि एक तर ती व्यक्ती खांदे उडवून नाही म्हणेल किंवा "पावभाजी सांडून जीन्स खराब झाली" हे वाक्य ऐकवेल.

2006 साली नारायण सुर्वेंशी गप्पा मारताना textile mill च्या विषयाला धरून त्यांनी मला सांगितले कि मिल मधले कामगार डबा घेऊन जात आणि त्या डब्यातील उरलेलं अन्न ते सगळे सरमिसळ करून त्याला थोडं गरम करून, मसाला टाकून पावा सोबत खात शिफ्ट संपताना. आणि त्यांचंच पुढचं संस्करण म्हणजे आपण खातो ती पावभाजी. विकिपीडियाला आधार मानलं तर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईच्या textile mill मधून हा पदार्थ उगम पावला.

अगदी त्याच दरम्यान अमेरिकेत खाणकामगार, कष्टकरी लोकांच्यासाठी टिकाऊ पण आरामदायी कापडाच्या गरजेतून जीन्स उदयाला आली. पुढे तिचे टिकाऊपण आणि सर्व प्रकारच्या कपड्यांसोबत चालून जाणे या दोन गुणवैशिष्टयांमुळे हि जीन्स खाणकामगारांपासून ते अगदी हॉलिवूड च्या सेलिब्रिटी पर्यंत सगळ्यांच्या अंगावर आली.

थोडक्यात, कधीकाळी कष्टकरी लोकांच्या गरजेतून निर्माण झालेल्या या दोन गोष्टी आज अगदी mainstream बनल्या आहेत. दैनंदिन जीवनात आपण वापरणाऱ्या कित्येक गोष्टी या अशाच औद्योगिक क्रांती, अंतराळ मोहिमा किंवा सैन्या साठी तयार केल्या गेल्या होत्या. आपण फक्त त्यांचा इतिहास जाणत नाही.

- फेसबुक पोस्ट (२१ एप्रिल २०१६, ०२.०६)

No comments:

Post a Comment