Wednesday, December 28, 2016

Convent School भारी की मराठी शाळा?


मेडिकल कॉलेज मध्ये असताना होस्टेलवासी जनता रोज एका कळीच्या विषयाला हात घालून चर्चा करायची, त्याला आम्ही 'सभा' म्हणायचो. तर एके दिवशी अशाच सभेमध्ये convent school भारी की मराठी शाळा यावर चर्चा सुरु झाली.

मी अर्थातच मराठी शाळेतून आलेलो असल्याने मराठी शाळेची बाजू लावून धरत होतो. आमचे काही convent school मध्ये शिकलेले मित्र मग त्यांच्याकडे कसे वेगवेगळे house होते (green, pink इत्यादी), sports competitions व्हायच्या, library आणि lab होत्या याची झकास वर्णने अभिमानाने सांगायला लागले. 

आता पंढरपूर सारख्या कुंकू, पेढे आणि वारी यावर जगून निघणाऱ्या गावातून आलेल्या, ज्याच्या शाळेचे नाव 'दत्तात्रय हरबाजी कवठेकर प्रशाला' आहे आणि जिथे PT च्या तासाला मैदानावर खडे गोळा करणे हा sport आहे, अशा पार्श्वभूमीच्या माझ्यासारख्या माणसाने या 'सेंट आणि फादर' नावे असणाऱ्या शहरातील मुलांना कुठे आपला अभिमान सांगावा? म्हणून आपले नमते घेऊन ऐकत होतो convent ची सुंदर वर्णने.

पण तेवढ्यात नितीन ओंबासे  या माझ्या कुशाग्र आणि तिरकस बुद्धीच्या मित्राच्या एका वाक्याने होत्याचे नव्हते केले. नितीन म्हणाला, "तुमचा सगळा मोठेपणा मान्य! पण, जन्मदात्या बापाला सोडून दुसऱ्या कुठल्या माणसाला 'फादर' म्हणून हाक मारायची नामुष्की आमच्यावर कधीही आली नाही !"

त्यानंतर साऱ्या 'सेंट आणि फादर' ची लेकरे आकाशातील प्रेमळ बापाचा धावा करत सभेतून पसार झाली !!

- फेसबुक पोस्ट (२१ एप्रिल २०१६, १७.५५)  

No comments:

Post a Comment