NEET परीक्षेबाबतचा माध्यमांतला गोंधळ आणि त्यात पालकांच्या आक्रोशाच्या बातम्या पाहून कुणालाही वाटेल कि हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. मी सांगतो... हो, अन्याय आहे, पण हुशार आणि अभ्यासू मुलांवर नाही तर श्रीमंत आई-बापाच्या नाठाळ मुलांवर जे MBBS च्या सीट 50-60 लाख डोनेशन देऊन विकत घेतात त्यांच्यावर.
एक काळ होता, मेडिकल कॉलेजेस फक्त सरकारी होती. आणि तेव्हा 12वी च्या PCB ग्रुप च्या मार्कांवर मेडिकल ला ऍडमिशन मिळायचं. त्या काळात अनेक गैरव्यवहार व्हायला लागले 12 वीच्या परीक्षेत, विशेषतः 20% मार्क असणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेत. या सगळ्या आक्षेपांना दूर करण्यासाठी आणि राष्ट्रपातळीवर होणाऱ्या परीक्षेची बरोबरी करण्यासाठी 1999 ला महाराष्ट्रात CET आली. त्या वर्षी पण खूप विरोध झाला हे बोलून कि ग्रामीण मुले CET मध्ये मागे पडतील. झाले उलट, 2000 साली माझ्या बॅच मधून पंढरपूर सारख्या गावातून 10 जण MBBS ला गेले जिथे वर्षाला 2-3 जायचे. कारण CET तुमचं English नाही तर PCB चं आकलन पाहत होती आणि त्यात ग्रामीण मुले कुठेही कमी नसतात.
बरं 1999-2000 च्या आसपास पण काही महान 'भारती'य अभिमत विद्यापीठे स्वत:ची प्रवेशपरिक्षा घ्यायची... पेन्सिल ने पेपर वर. जिचे निकाल अपेक्षेकृत ज्यांनी 20 लाख रुपये डोनेशन देऊन 6 महिने आधी सीट बुक केलीय अशा हुशार विद्यार्थ्यांना सोयीचे लागायचे. बोर्डात, केंद्रात पहिले आलेले विद्यार्थी त्यात नापास होत आणि PCB ला 40% मार्क पाडणारे गुणवंत तिथे टॉपर असत. पुढे जेव्हा CET खासगी, अभिमत विद्यापीठांना पण लागू करा असा आदेश यायला लागला, तेव्हा या खासगी आणि अभिमत विद्यापीठांनी आपली असोसिएशन बनवून आपली वेगळी परीक्षा चालू ठेवून, हे 40% वाले गुणवंत डॉक्टर बनवणे चालूच ठेवले.
जेव्हा असोसिएशन च्या गैरव्यवहाराची दखल घेत कोर्टाने सबंध देशात एकच NEET परीक्षा घ्या असा आदेश दिला तेव्हा मात्र आता हे शिक्षणसम्राट आणि 40% वाल्या गुणवंतांचे श्रीमंत पालक जोराने बोंबा ठोकतायत. यांचे आक्षेप काय ते पाहू आपण -
- दोन महिन्यात मुलांचा अभ्यास होणार नाही.
उत्तर: सबंध महाराष्ट्रातल्या मुलांना एकाचवेळी एक परीक्षा लागू केली जातीय. अभ्यासक्रम पण एकच आहे. आणि सगळ्यांना मिळणारा वेळ पण सारखाच. मग कुणाही विद्यार्थ्यावर विशेष आणि वेगळा अन्याय नाही.
- NCERT ची पुस्तके मिळत नाहीत.
उत्तर: सगळी पुस्तके इंटरनेट वर सहज उपलब्ध आहेत. नसतील तरी उपलब्ध करून देता येतील. आणि HSC आणि NCERT च्या पुस्तकांमध्ये काही जमीन अस्मानाचा फरक नाही. आणि जरी 4-5 धडे वेगळे असले तरी ते 2 महिन्यात शिकता येणार नाहीत?? - मराठी मुलांवर अन्याय होईल.
उत्तर: काहीही अन्याय नाही. उलट फायदा आहे. सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये तशाही 85% जागा महाराष्ट्रीय मुलांना राखीव असतात, त्या कुठेही जाणार नाहीयेत NEET मुले. उलट खासगी आणि अभिमत विद्यापीठात बऱ्याच 40% वाल्या गैरमराठी विद्वानांच्या जागी, आपली खरीखुरी हुशार मुले प्रवेश घेऊ शकतात.
NEET खासगी आणि अभिमत मेडिकल कॉलेजेसच्या गैरप्रकारांना वेसण घालणारी परीक्षा आहे. आणि हे शिक्षणसम्राट सर्व पक्षाचे मोठे नेते आहेत. म्हणून हि सगळी माध्यमातील बोंबाबोंब सुरु आहे. आणि या शिक्षणसंस्थांचे लाभार्थी हे 40% मार्क वाले श्रीमंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत. हीच मुले पूढे डॉक्टर बनल्यावर बापाचा पैसा सव्याज वसूल करण्यासाठी नको ते गैरमार्ग वैद्यकीय व्यवसायात आणतात आणि डॉक्टरी व्यवसायाला बदनाम करतात.
सुप्रीम कोर्टाने NEET सार्वत्रिक सक्तीची करणे हा एक ऐतिहासिक आणि लोकहिताचा निर्णय आहे. CAT, JEE सारख्या परीक्षांना कुणी विरोध का करत नाही? कारण त्या परीक्षा खरच लायक असणाऱ्या विद्यार्थ्यांना IIM आणि IIT मध्ये प्रवेश देतात. आणि म्हणूनच IIM व IIT ची जगात, बाजारात किंमत आहे. 12 वी ला काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करोडभर रुपये डोनेशन आणि फी घेऊन त्यांना डॉक्टर बनवणाऱ्या संस्था या वैद्यकीय व्यवसायाला कलंक आहेत, आणि आज त्या संस्थांची पाठराखण करणारे सर्वपक्षाचे राजकारणी पण. आणि हे सर्व माहित असून माध्यमांत या संस्थांची तळी उचलून धरणारे पत्रकार, संपादक तर अजून विकाऊ आहेत. देशातली हालाखीची आरोग्यव्यवस्था या सर्वांची देण आहे आणि NEET आली नाही तर कदाचित हे चित्र अजून भीषण होईल.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १८ मे २०१६, १७.४९ )
No comments:
Post a Comment