Saturday, January 21, 2017

एक बोधकथा -

एका छोट्या तळ्यात काही बेडूक राहत होते. एके समयी तळ्याबद्दल अभिमान निर्माण होऊन त्यांना वाटायला लागले की आपल्या तळ्याला एखादा राजा हवा. बेडकांनी देवाकडे प्रार्थना केली," हे परमेश्वरा, आम्हाला एक राजा हवाय". परमेश्वराने थोडा विचार केला आणि एक छानसा लाकडी ओंडका त्या बेडकांना दिला आणि सांगितले,"हा तुमचा राजा. आनंदाने रहा!". ओंडकारुपी नवीन राजा मिळाल्यावर बेडूक खूप खुश झाले. ते त्या ओंडक्यावर खेळू लागले, त्यावरून पाण्यात उड्या मारू लागले. लाटेसोबत ओंडका वरखाली झाला की त्याच्यावर बसण्याची मजा अनुभवायला लागले. एकंदरीत सगळं छान चाललं होतं कारण राजाही एकदम निरुपद्रवी होता. 

पण काही साहसी बेडकांना थोड्या दिवसाने नवीन राजा आवडेनास झाला कारण हा ओंडकारुपी राजा बोलतच नव्हता, स्वतःहून काहीही राजाला शोभेसे असा आवेश, आक्रमकता दाखवतच नव्हता. ते साहसी बेडूक परत देवाकडे फिर्याद घेऊन गेले," काय हे देवा? हा कसला राजा? हा ना बोलतो ना चालतो. एका जागी शांत बसून असतो फक्त. कसला आवेश नाही की आक्रमकता नाही. असला कुठं राजा असतो का? आम्हाला खराखुरा राजा दे, ज्याच्याबद्दल आम्हाला गर्व वाटेल".

देवाने परत थोडा विचार केला की ही मागणी तर रास्त आहे. देव म्हणाला "तथास्तु! तुमच्या मनासारखा राजा देतो. आनंदात रहा." आणि त्यानंतर देवाने त्या लाकडी ओंडक्याचा एक डौलदार व आक्रमक अजगर बनवून टाकला. साहसी बेडूक नवीन राजा बघून खूप खुश झाले, म्हणाले,"याला म्हणतात राजा! काय रुबाब आहे, काय रूप आहे! व्वा देवा, मानलं तुला!". बेडकांचे हे वाक्य ऐकून देवही आनंदाने अंतर्धान पावला.

त्यानंतर काही साहसी बेडूक सवयीप्रमाणे नवीन राजाच्या, अजगराच्या अंगावर खेळू लागले. अजगर पाण्यात पोहताना त्याच्या अंगावर बसून सगळ्या तळ्याची फेरी अनुभवू लागले. आनंदाला आता तोटाच नव्हता. पण दिवस सरता सरता अजगराला भूक लागली आणि मग स्वभावधर्मा नुसार नव्या राजाने पोट भरायला एकेक बेडूक अर्थात प्रजेला खायला सुरुवात केली. सारा आनंद अचानक कोलाहलात, दुःखात नाहीसा झाला. बेडकांनी परत देवाचा धावा करायला सुरुवात केली, पण या वेळेस देवही झोपी गेलेला होता!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १४ डिसेंबर २०१६, ०९.१७ )

No comments:

Post a Comment