Saturday, January 21, 2017

टाकी धुणे आहे !!

आमच्या सोसायटीच्या गच्चीवर पाण्याच्या खूप साऱ्या टाक्या आहेत. साधारण लाखभर लिटर पाणी त्या टाक्यांत बसते, कारण सोसायटी खूप मोठी आहे, सुमारे 500 कुटुंबाना दरदिवशी प्रतिकुटुंब 200 लिटर च्या हिशेबाने ते पाणी पुरेसे होते. आता इतके पाणी वर भरले जाते म्हणल्यावर हळूहळू त्या टाक्यांत कचरा पण जमा होणारच. पण त्याने विशेष काही फरक पडत नव्हता, कारण ते पाणी वापरायच्या कामाचे होते आणि त्या मानाने पुरेसे स्वच्छ होते.

सोसायटीने गेल्या आठवड्यात एक नवीन अतिउत्साही प्लंबर कामाला ठेवला. त्याने तो टाक्यांमधला कचरा पाहिला आणि तो स्वच्छ करायचा निर्णय एकट्यानेच घेतला. एके दिवशी सकाळी सगळी सोसायटी हवालदिल होऊन पाहत होती की एकाही नळाला पाणी नाही. बाथरूम मध्ये पाणी नाही, RO च्या युनिट ला पाणी नाही, वापरायला पाणी नाही. थोडी चौकशी केल्यावर कळाले की नवीन प्लंबर ने गच्चीवरच्या साऱ्या टाक्यांमधले पाणी सोडून दिले होते, टाक्या स्वच्छ करायला.

लोक चिडले, वैतागले... शौचाला पाणी नाही, आंघोळीला नाही, प्यायला पाणी नाही, कपडे धुवायला पाणी नाही, भांडी धुवायला पाणी नाही. सारी सोसायटी लकवा मारावा तशी खोळंबून बसली होती.

प्लंबर ला बकोटीला धरून सोसायटीच्या लोकांनी विचारले...

लोक: तुला साऱ्या टाक्या एकत्र रिकाम्या करण्यापेक्षा, एकामागून एक करत धुता येत नव्हत्या का?

प्लंबर: साऱ्या टाक्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत, एकत्र धुण्याशिवाय पर्याय नाही.

लोेक: ठीक आहे. पर्यायी पाण्याची काय व्यवस्था केलीय तू?"

प्लंबर: प्रत्येक घराला, दरदिवशी 5 लिटर पाण्याचा कॅन पुरवतो मी. काहीही अडचण येणार नाही.

लोक: तुला वेड लागलय का? 5 लिटर पाण्यात अख्ख्या कुटुंबाने दिवस कसा काढायचा? माणसाने पाणी प्यायचं किती, आणि वापरायचं किती? तुला अक्कल आहे का?

प्लंबर (रडवेल्या सुरात): मी तुमच्यासाठी एवढ्या टाक्या स्वच्छ करायला घेतल्यात, तुमच्यासाठी एवढे कष्ट घेतोय, आणि तुम्हाला थोडा पण त्रास सहन करायला नको का?

लोक: बरं बाबा. रडू नकोस. आज काही तरी करून भागवू उरल्यासुरल्या पाण्यात. उद्या वेळेवर पाणी येईल?

प्लंबर: उद्या कसं येईल? अहो इतक्या साऱ्या टाक्या आहेत.... धुवायला किमान 50 दिवस लागतील ना. तोवर मी रोज एक 5 लिटर चा कॅन देत राहीनच! एवढे 50 दिवस सहन करा, नंतर बघा तुमच्या नळाला कसं RO सारखे स्वच्छ पाणी येतंय ते!

त्याच्या ह्या वाक्याने जे व्हायचं ते झाले! लोकांनी टाक्या धुवायच्या आधी प्लंबर ला धु-धु धुतला. आणि असला मूर्ख प्लंबर कामाला ठेवणाऱ्या सोसायटीच्या मेंटेनन्स मॅनेजरला सुद्धा!!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १४ नोव्हेंबर २०१६, १९.४७ )

No comments:

Post a Comment