Saturday, January 21, 2017

फेसबुकी सेलेब्रिटी आणि समाजभान

फेसबुकच्या आभासी दुनियेतले फॉलोअर्स सुद्धा काही लोकांना खऱ्या दुनियेत सेलेब्रिटींसारखे बेताल वागायला आणि बोलायला प्रवृत्त करू शकतात हा नवीन प्रकार पाहायला मिळतोय. आणि त्या बेताल बडबडीला सुद्धा लोक समर्थन देतात हे तर अजूनच भारी दिसतेय.

मला सलमान खान आवडतो पण फक्त 'मैने प्यार किया', 'अंदाज अपना अपना' मधल्या कामासाठी आणि त्याच्या बांधेसूद शरीरासाठी. बाकी सलमानने लोकांच्या अंगावर गाडी घालून मारले आणि म्हणले की "याला वाहतूक पोलीस जबाबदार आहेत. त्यांनी कुठे लिहिलंय की फुटपाथवर गाडी चालवायची नाही म्हणून?" तर तो मूर्खपणा ठरेल. आणि अभिजीत सारख्या मूर्ख भक्तांनी अशा अर्थाची विधाने केली सुद्धा आणि त्याला भाई समर्थकांनी आनंदाने retweet सुद्धा केले.

जगात प्रत्येक ठिकाणी सूचना, कायदे आणि निर्देशांच्या पाट्या लावता येत नसतात. ते समस्त कायदे, निर्देश स्वतःहुन समजून घ्याव्या लागतात आणि त्यानुसार एक सभ्य व सुजाण नागरिक म्हणून वागावे लागते. 'Civic sense' हा मनात असावा लागतो, संस्कारांतून-विचारांतून अंगी बाणवावा लागतो. 'जंगलात, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात प्लॅस्टिकचा कचरा टाकू नये' अशा आशयाचे फलक दर पावलावर लावलेले नसतात, पण तरीही शहाणे लोक तसे काही करत नाहीत. आणि शहाण्या लोकांचे अनुकरण करत बाकीचे लोकही हळूहळू त्या गोष्टी शिकून घेतात. बदल एका रात्रीत कुठला कायदा करून किंवा फलक लावून होत नसतात. ऑस्ट्रेलियन एम्बसी च्या भिंतीवर 'येथे लघवी करू नये' असे लिहिलेले नाही म्हणून तेथे लघवी करून दाखवायची नसते.

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( २३ नोव्हेंबर २०१६, १५.४० )

No comments:

Post a Comment