Saturday, January 21, 2017

मॉल, पॉपकॉर्न व किंमत -

रस्त्यावर १० रुपयांना मिळणारा पॉपकॉर्न मॉल/थिएटर मध्ये जेव्हा १७५ रूपयांना मिळतो तेव्हा भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. ही लूट आहे, हे अतर्क्य आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया आपण ऐकतो किंवा स्वतःसुद्धा देतो प्रसंगी. कमीअधिक हाच प्रकार आपणाला विमानतळ, रेल्वे स्टेशन अशा सरकारी मालकीच्या ठिकाणी पण पाहायला मिळतो. मॉल सारख्या खासगी ठिकाणी आपण हे समजू शकतो, पण सरकारी ठिकाणी पण ही लूट? .... खरंच ही लूट असते का?

आपण जेव्हा एखाद्या मॉल/थिएटर मध्ये पॉपकॉर्न विकत घेतो, तेव्हा आपण फक्त वस्तू विकत घेत नाही तर सोबत अदृश्य स्वरूपात सेवा सुद्धा विकत घेत असतो. आपण रस्त्यावर पॉपकॉर्न घेतो तेव्हा आपण फक्त १० रुपये देतो आणि त्याबदल्यात वस्तू विकत घेतो. पण जेव्हा हाच विनिमय मॉल मध्ये होतो तेव्हा आपल्या पायाखाली असणारी जमीन ही हजारो रुपये प्रति वर्ग मीटर, प्रति महिना अशा दराने भाड्याने घेतलेली असते त्या विक्रेत्याने. वातानुकूलन यंत्रणा पूर्णवेळ महागड्या औद्योगिक वीजदरावर चालू असते. लक्झरी टॉयलेट असतात, फरशी पुसणे सतत चालू असते, लिफ्ट/escalators चालू असतात, विजेचे दिवे तेवत असतात, सुरक्षा व्यवस्था असते, बसायला ठिकठिकाणी सोफे असतात.

वर उल्लेख केलेल्या सगळ्या सेवा, व्यवस्था ज्यांना प्रचंड पैसा खर्च करावा लागतो त्या कुठलाही भेदभाव न होता तुम्हाला फुकट मिळत असतात. तुम्ही एक रुपयाची खरेदी नाही केली तरी मॉल मध्ये तुम्ही हे सर्व मोफत अनुभवून, वापरून माघारी येऊ शकता. मग मॉलने या सर्वांचा खर्च काढायचा कुठून? म्हणून ज्याही ठिकाणी पैसे आणि वस्तू/सेवा यांचा विनिमय होतो तिथे मॉल्स हा सर्व खर्च विभागून किंमती वाढवून वसूल करतात. त्यामुळे जे लोक मॉलमध्ये पैसे खर्च करतात ते लोक या सर्व सेवांना अदृश्यपणे पुरवत असतात. हा प्रकार तसाच आहे जसा देशात राहताना आपणांस फुकट संरक्षण मिळते तसा असतो. आपण टॅक्स भरा, न भरा, देशाच्या सेनेला तुमचं संरक्षण करावंच लागतं अगदी तसाच हा प्रकार ... free goods/services चा!

काही लोक विचारतील की ताज हॉटेल मधल्या चहात असं काय वेगळं आहे की त्याला ४००-५०० रुपये द्यावेत? पुन्हा उत्तर तेच येईल... ताजमधल्या सार्वजनिक सेवा कुणीही मोफत वापरू शकते. त्यांच्या lounge मध्ये निवांत बसू शकते, पेपर वाचू शकते, AC ची हवा खाऊ शकते, कॉमन टॉयलेट वापरू शकते. आणि कुठल्याही पंचतारांकित हॉटेलना या सर्व सामायिक सेवा मोफत द्याव्या लागतात तुम्ही तिथे राहताय की नाही हे न विचारता. म्हणूनच जेव्हा तुम्ही जेव्हा ताज मध्ये मिनरल वॉटर विकत घेता तेव्हा तो वेटर तुम्हाला कधीही ती बॉटल सील असताना देत नाही तर उघडून ग्लासात ओतून देतो. पाण्याची किंमत २० रूपये, उरलेले १५०-२०० रुपये त्यांच्या सेवेचे ! यात कुठलाही कायदा मोडला जात नाही.

मॉल, विमानतळ, पंचतारांकित हॉटेल अशा ठिकणी ज्या वस्तू सीलबंदच विकाव्या लागतात उदाहरणार्थ शीतपेये वगैरे, तिथे अजून एक प्रकार केला जातो त्याला म्हणतात Channel Pricing. जसं की या ठिकाणी घेतलेल्या शितपेयांवर, अन्नपदार्थांवर सामान्य ठिकाणी मिळणाऱ्या त्याच वस्तूच्या, त्याच पॅकिंग पेक्षा वेगळीच आणि जास्त MRP लिहिलेली असते. आणि सोबत एक वाक्य पण छापलेले असते "Specially packed for indian Railways" अशा आशयाचे. यात काही चुकीचे आहे का? तर नाही.. हे कायद्याला धरून आहे. ज्या पद्धतीने मिलिटरी कँटीन मध्ये बाजारातील MRP पेक्षा कमी दराने वस्तू मिळतात आणि त्यावर "Specially packed for Indian Army" असं लिहिलेल असतं त्याच्याच हा उलट प्रकार.

तेव्हा यापुढे जेव्हा मॉल मध्ये वाढीव दराचे पॉपकॉर्न, कोल्ड-ड्रिंक दिसले तर फार आश्चर्य मानू नका. कुणीही तुम्हाला लुटत नाहीये. तुम्हाला ते पॉपकॉर्न खायची, विकत घ्यायची कुणीही जबरदस्ती केलेली नाहीये. जोवर अशा चढ्या दराने वस्तू विकत घेणारे लोक आहेत तोवर त्या चढ्या दराने या वस्तू पंचतारांकित ठिकाणी विकल्या पण जातील. यात कुठलाही कायद्याचं उल्लंघन नाहीये. ग्राहक म्हणून तुम्ही एक गोष्ट करू शकता, मॉल वाल्याना फुकट पिण्याचे पाणी उपलब्ध करून ठेवायला भाग पाडू शकता जे त्यांना बंधनकारक आहे कारण माणसाला पाणी अत्यावश्यक आहे. आणि सजग नागरिक म्हणून अजून एक गोष्ट करू शकता, ती अशी की बाजारभावाने वस्तू, सेवा पुरवणाऱ्या मॉल/हॉटेल्सना (आणि खासगी शिक्षणसंस्थाना) सवलतीच्या दरात जागा/इमारती देण्याची राजकीय नेत्यांची कारस्थाने उधळून लावू शकता.

- डॉ. विनय काटे

4 comments:

  1. दादा आपल्या सोबत theater मध्ये पाणी किंवा चिप्स ची पाकिटे असल्यास ती काढून घेतली जातात ,ते कायद्याने योग्य कि अयोग्य?

    ReplyDelete