डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष बनतील याबाबत सर्वांनाच संदेह होता आणि त्यात वावगेही काही नव्हते. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक उद्योगपती जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची स्वप्ने पाहतो तेव्हा हा संदेह स्वाभाविक आहे. जसजसा इलेक्शन चा रंग चढत गेला तसे ट्रम्प हिलरी पेक्षा मागे राहतील हा ट्रेंड सगळीकडेच दिसत होता. पण या सगळ्या ट्रेंडना मात देत ट्रम्प जिंकून आले आणि लोकमत किती अनाकलनीय असते याचा परत एक प्रत्यय समस्त एक्झिट पोल वाल्यांना आला.
ट्रम्प यांचा अमेरिकेतील विजय आणि भारतातील मोदींचा विजय यात खूप समान धागे आहेत. राष्ट्रीय राजकारणाचा अननुभव, वादग्रस्त पार्श्वभूमी, स्वपक्षीयांचा अघोषित विरोध, टोकाच्या भूमिका या समान गोष्टी असूनही दोन्हीकडे या दोघांनी विजयाला गवसणी घातली. दोन्हीकडे त्यांच्या वैयक्तिक बाबींवर खरपूस टीका केली गेली, त्यांना वैयक्तिक दूषणे दिली गेली. पण, बहुसंख्य लोकसंख्येच्या दुखावल्या गेलेल्या सुप्त भावना, त्यांचे अनुत्तरित आर्थिक/सामाजिक प्रश्न यांना या दोघांनी आवाज दिला. आणि त्याचे योग्य ते फळ त्यांना मिळाले.
ट्रम्प त्यांच्या आक्रस्ताळी भाषणांसाठी प्रसिद्ध राहिले असले तरी आज निवडणुकीचा निकाल आल्यावर आज त्यांनी केलेले भाषण खूप संतुलित होते. कसल्याही युद्धाच्या वलग्ना त्यांनी केल्या नाहीत आणि कुठल्याही धर्माच्या, देशाच्या विरोधात त्यांनी एकही वाक्य बोलले नाही. उलट ट्रम्प आज देशाची पुनर्बांधणी करायची, लोकांना रोजगार द्यायची भाषा करत होते. त्यांनी हिलरीचेही आभार मानले आणि त्यांनी दिलेल्या लढ्याचे कौतुकही केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना सोबत घ्यावे (ज्यांना यायचं आहे त्यांना ही अट जोडून) असंही ते बोलले, ज्याचे गर्भित अर्थ येणारा काळ सांगेलच.
बोलल्या गोष्टींपेक्षा पण न बोललेले जास्त महत्वाचे असते. ट्रम्प आज गळ्यात लाल रंगाचा टाय घालून आले होते. याच रंगाचा टाय ओबामांनी निवडणूक जिंकल्यावर घातला होता, आणि लादेनला मारल्यानंतरच्या भाषणात पण घातला होता. हा लाल रंगाचा टाय आंतरराष्ट्रीय राजकारणात नेते तेव्हा वापरतात जेव्हा त्यांना स्वतःचे सामर्थ्य आणि बेधडक वृत्ती यांचा संदेश राजकीय विरोधकांना सुप्तपणे द्यायचा असतो. आजच्या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट होत होती की ट्रम्प यांचा राजकारणी चेहरा समोर यायला सुरुवात झालीय आणि सोबतच त्यांची देहबोली त्यांच्यातला आक्रस्ताळी अब्जाधीश अजून तसाच आहे हेही दाखवते.
ट्रम्प यांचा कालखंड हा बऱ्याच कारणांसाठी वादळी ठरणार आहे. अमेरिकेच्या बहुसंख्य श्वेतवर्णीय जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता करता ट्रम्प बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांच्या बेधडक वृत्तीमुळे लोकांना, राजकीय विश्लेषकांना चांगल्या-वाईट दोन्ही पद्धतीने चकवा देणार आहेत. येणारी 4 वर्षे आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी खूप अस्थिर असणार आहेत.
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ९ नोव्हेंबर २०१६, २१.२६ )
No comments:
Post a Comment