Wednesday, January 4, 2017

मार्केटींग आणि सेलिब्रिटी


वाघोलीच्या आजूबाजूला कुठेतरी मांदेलेवाडी नावाच्या गावात असणाऱ्या अपार्टमेंटच्या जाहिरातीत "हा पृथ्वीवरचा स्वर्ग, येथे राहायला या!" म्हणून आवाहन करताना प्रियांका चोप्रा दिसते. आता ही बया हॉलिवूडच्या कामातून वेळ मिळेना म्हणून भारतात येईना लवकर, तिथे कशाला या वाडीत मरायला येईल स्वतः? पण, लोक तिचा फोटो बघून घायाळ होणार आणि फ्लॅट बुक करणारच !

Lux च्या जाहिरातीत जितक्या सौंदर्यवती आजवर झळकल्या त्यातल्या एकीनेही शौचकूपाला भेट दिल्यावर हात धुवायलासुद्धा Lux चा साबण वापरला नसेल. त्यांची कुत्री सुद्धा परदेशातून मागवलेल्या शॅम्पूने आंघोळ करत असतील. पण, तरीही तिने "माझ्या सौंदर्याचं रहस्य, Lux!" म्हणले कि आमच्या गावरान गंगू लगेच Lux आणायला उड्या मारणार!

यामी गौतम मुळात इतकी गोरी आहे की तिच्या खोलीत ट्यूबलाईटची सुद्धा गरज पडत नसावी. आता तिला गोरे व्हायला कशाला 'Fair & lovely' ची गरज असावी? पण ती देतेय चॅलेंज तुम्हाला गोरे व्हायचे आणि तुम्ही इमानेइतबारे ती क्रीम तोंडाला फासून बसलाय तुमचा उजेड पडायची वाट पाहत!

सलमान खानचे शरीर 1988 पासून पिळदार आहे. तेव्हा Revital नावाची डबी बाजारात मिळत पण नव्हती. पण, जेव्हा सलमान सांगतो कि त्याचा आणि त्याच्या वडिलांचा सुद्धा फिटनेस Revital मुळे आहे तेव्हा तुम्ही जाऊन आणणारच ते बाजारातून. बाकी, याच Revital ने युवराज सिंग ला कँसर झाला म्हणून हळूच brand ambassador वरून बाजूला करून सलमानला आणले होते हे तुम्हाला कळले पण नसेल!

Lancer आणि Metro असल्या ब्रँड च्या चपला वरुण धवन किंवा अक्षय कुमार बाथरूमला जायला सुद्धा वापरत नसतील. शाहरुख आयुष्यात कधीही Big Basket वरून किराणा मागावणार नाही की Santro चालवणार नाही. फरीदा जलाल कधीही गावंढळ माणसा सारखे भुरके मारून चहा पीत नसणार. आणि पार्कर च्या पेनापासून Jioच्या फोन पर्यंत काहीही विकणारे अमिताभ बच्चन तर स्वतः endorse केलेल्या 1% ब्रँडच्या वस्तू सुद्धा वापरत नसणार याची पुरेपूर खात्री मला तरी आहे, कारण खूप स्वस्त गोष्टी असतात हो त्या!

सेलेब्रिटी स्वतः कधीही न वापरलेल्या, न केलेल्या गोष्टी तुम्हाला राजरोस विकतात आणि तुम्ही त्या डोळे झाकून विकत पण आणता कसलाही विचार न करता. सेलेब्रिटी असो, राजकारणी असो की धर्माचे ठेकेदार.... तुम्ही नेहमी उल्लू बनत राहणार सगळ्यांकडून!!

डॉ. विनय काटे

(ता.क. बाजीगर मधली काळीसावळी काजोल, 25 वर्षानंतर दिलवाले मध्ये जितकी गोरीपान सुंदर दिसतेय ते पाहता तिने रजनीकांतच्या मेकअपमॅन ला नोकरीवर ठेवलेले असावे असा दाट संशय आहे. या जगात तो मेकअपमॅन हाच एक खरा माणूस आहे जो काहीही करू शकतो, त्याला शोधा आणि त्याचे पाय धरा. बाकी बकवास आहेत सर्व !!)

- फेसबुक पोस्ट ( ९ सप्टेंबर २०१६, ०९.२९ ) 

No comments:

Post a Comment