Wednesday, January 4, 2017

'तो' आणि 'ती' - एक सत्यघटना


तो अविवाहित मुस्लिम डॉक्टर त्या आडवळणी गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला. तिथे एक सुंदर हिंदू सवर्ण विवाहित परिचारिका सेवेत होती. तिला 5-6 वर्षांचा मुलगा असला तरी शरीराने बांधेसूद आणि अत्यंत देखणी होती ती. डॉक्टर आरोग्य केंद्रातच कायम मुक्कामी होता आणि ती जिल्ह्याच्या ठिकाणी कुटुंबासोबत राहून ये-जा करत नोकरी करायची. कधी कधी ड्युटी रोटेशन नुसार नाईट शिफ्ट साठी तिला आरोग्य केंद्रात पण मुक्काम करावा लागे, जसा बाकीच्या परीचारिकाना करावा लागायचा.

त्या परीचारिकेला त्या केंद्रात काम करत एखादं वर्ष झालं होतं आणि तिच्या सौंदर्याचा मोह होऊन किती तरी जणांनी खडा टाकून पाहिला होता ज्याला ती बधली नव्हती. ज्या गावात ते आरोग्य केंद्र होतं, ते जवळपास अख्ख गाव त्या परीचारिकेच्याच जातीचे होते. पण तरीही एकाही गावच्या पुढाऱ्याने, टवाळ पोराने तिला पटवायचा प्रयत्न केला नाही असं काही झालं नव्हतं. कुणालाही भाव न देणारी ती विवाहित परिचारिका मात्र हळूहळू नव्याने रुजू झालेल्या मुस्लिम डॉक्टरच्या प्रेमात पडली. तिने पुढाकार घेतला आणि त्याने जास्त आढेवेढे ना घेता होकार दिला.

डॉक्टर आणि परिचारिका यांच्यातल्या आलेल्या संबंधाची माहिती अगदी 1-2 दिवसांत गावातल्या पुढारी आणि टग्यांना मिळाली, आरोग्य केंद्रासमोर चहाची टपरी चालवणाऱ्या माणसाकडून, जो रात्री सुद्धा परीचारिकेच्या खोलीकडे लक्ष ठेवून असायचा. अजून 2-3 दिवस पाळत ठेवून एका रात्री गावगुंडानी ती परिचारिका आणि तो डॉक्टर यांना डॉक्टरच्या खोलीचा दरवाजा तोडून जवळपास नग्नावस्थेतच पकडले. डॉक्टरला यथेच्छ मारहाण करण्यात आली, धर्मावरून उद्धार झाला. परीचारिकेला त्या अवस्थेत पाहून ओंगळवाणे स्पर्श केले आणि मारहाण सुद्धा. दुसऱ्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने डॉक्टरची बदली केली आणि परिचारिकेला सक्तीच्या सुट्टीवर पाठवले. गावगुंडांचा कंड त्या दिवशी शमला होता!

एका विवाहित स्त्रीने तिची संभोगेच्छा, सामाजिक बंधने डावलून थोड्या काळासाठी पुरी केली तर तथाकथित नीतिमान समाजाच्या बुडाखाली जाळ लागला होता!
हा तोच समाज होता, ज्यांनी सामायिक पत्नीला जुगारात पणाला लावणाऱ्या नालायक पुरुषांना देवत्व दिले, धोब्याने घेतलेल्या संशयावरून बायकोला आगीत ढकलणाऱ्या आणि सोडून देणाऱ्या पुरुषाला 'मर्यादा पुरुषोत्तम' मानले आणि बहुपत्नीक असणाऱ्या पुरुषाच्या परस्त्रीयांसोबतच्या कामक्रीडेला 'रासलीला' म्हणून पुजले!! तोच समाज ज्याने विवाहाच्या नावाखाली बायकांचे कायदेशीर बलात्कार केले, अल्पवयीन मुलींना देवदासी म्हणून सोडून त्यांना अख्ख्या गावाने भोगले आणि या देवदासींच्या मुलींना नव्याने देवदासी केले.

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं,
करू दे की! मला सांगा तुमचं काय गेलं?

ह्या कवितेवर पाडगावकरांना दिलखुलास दाद देणारा समाज, जेव्हा 'तो' किंवा 'ती' भिन्न जाती-धर्माचे, वैवाहिक स्थितीचे असतात किंवा आपल्या घरातले कुणीतरी असतात किंवा आपल्याला फाट्यावर मरणारे असतात तेव्हा 'तो' आणि 'ती' च्या जीवावर का उठतो???

- विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १६ सप्टेंबर २०१६, १८.१७ ) 

No comments:

Post a Comment