Wednesday, January 4, 2017

गांधीजी


गांधीजी एक कुशाग्र राजकारणी होते. हजारो जाती आणि भाषांमध्ये विभागलेल्या देशाला एका हाकेसरशी एक होऊन अहिंसक मार्गाने रस्त्यावर उतरायला भाग पडणारा एक प्रचंड ताकदीचा संघटक आणि नेता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधींजींचे योगदान हे निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.

बाकी गांधींची आफ्रिकेत असताना भारतीयांना अफ्रिकन काळ्या लोकांपेक्षा सरस ठरवायच्या प्रयत्नात ब्रिटिशांना युद्धात मदतकर्तेही झाले, जिथे त्यांची भूमिका थोडीशी मवाळ वर्णभेदी आहे. पुढे भारतात आल्यावर त्यांनी तत्कालीन दलितांना हरिजन असे संबोधून त्यांना समाजात चांगले स्थान देण्यासाठी काही प्रयत्नही केले, पण तरीही त्यांच्या मनातील सनातनी हिंदू संस्कार त्यांना पूर्णपणे टाकता आले नाहीत हेही तितकेच सत्य आहे. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला सहकार्य देण्याचा त्यांचा निर्णय हासुद्धा बऱ्यापैकी अतार्किक आहे, पण त्यामुळे त्यांच्या हेतूंवर शंका घेता येत नाही. 

वेळ, प्रसंग आणि सभोवतालची परिस्थिती यानुरूप गांधींनी स्वतःला बऱ्यापैकी बदलत नेले. त्यांचा शाकाहाराचा आग्रह, उपोषण, सार्वजनिक प्रार्थना आणि काही 'सत्याचे प्रयोग' हा बऱ्यापैकी न पटणारा भाग आहे. पण, त्यांनी आयुष्यात जे केले ते प्रामाणिकपणे स्वतःहून सर्वांना सांगितले कसलाही संकोच न बाळगता. वैयक्तिक आयुष्य सार्वजनिकरित्या जाहीर करायची एवढी सत्यनिष्ठता आणि हिंमत कधीच कुठल्याही नेत्याने भारतात तेव्हाही दाखवली नाही आणि आजही दाखवत नाहीत.

धर्म आणि राजकारणाची अभद्र सरमिसळ सुद्धा त्यांनी केली, पण धार्मिक दंगलीमध्ये हा माणूस शांतता प्रस्थापित करत होता. ज्या दिवशी देश स्वतंत्र होत होता, त्यादिवशी हा माणूस विरक्त होऊन नोआखाली मधल्या धार्मिक दंगली शांत करत होता. स्वतःवर जीवघेणे हल्ले झाले तरी हा माणूस कधीही संरक्षण घेऊन फिरला नाही. स्वतःची मुले हलाखीच्या परिस्थिती मध्ये होती पण या माणसाने कधीही त्यांना विशेष आर्थिक लाभ किंवा राजकीय पदे दिली नाहीत.

जगाच्या दृष्टीने चूक आहेत की बरोबर याची तमा न बाळगता स्वतःच्या मूल्यांवर अफाट विश्वास असणारा एक अतुलनीय साहसी आणि तेवढाच हसतमुख नेता होते गांधीजी. अशी असंख्य कारणे आहेत ज्यांमुळे मी कदाचित त्यांना 'महात्मा' संबोधत भक्तिभावाने हात जोडणार नाही (तसाही मी कुठल्याच नेत्याप्रती भक्ती ठेवत नाही), पण त्यांच्या अफाट कार्याला, त्यांच्या संघटनकौशल्याला, त्यांच्या आत्मनिष्ठेला आणि अमर्याद आत्मविश्वासाला माझा सलाम! असा राजकीय नेता होणे नाही!!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २ ऑक्टोबर २०१६, १७.३२ )

No comments:

Post a Comment